युद्धखोर देशांच्या राष्ट्रीय दालनांचा समावेश असल्यामुळे यंदाच्या व्हेनिस आर्ट बिएनालेसंदर्भात उद्भवलेल्या वादांचा समाचार घेण्याचा सूर बुधवारी बिएनालेच्या आयोजक संस्थेचे अध्यक्ष पिएत्रांजेलो बुटाफुओको यांनी पत्रकारांसमोर लावला. चंद्राकडे बोट दाखवणार्‍यांच्या बोटाकडे कोणीच पाहात नाही- लोक चंद्राकडेच पाहाणार; अशा शब्दांत त्यांनी वाद विरणारच आणि लोक कलाकृतींकडेच पाहाणार, असा ठाम दावा केला!

पण या काव्यात्म उपमेनं पत्रकारांचं समाधान होणार नाही, म्हणून त्यांनी- आम्ही कलेची स्वायत्तता जपतो आहोत, असंही सांगितलं तिथं मात्र ते फसले… कारण, आम्हाला आमची स्वायत्तता जपू दिल्याबद्द्ल आम्ही इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे ऋणी आहोत, हेही त्यांना म्हणावंच लागलं. एक प्रकारे, आमच्या संस्थेची स्वायत्तता सरकारवर अवलंबून असल्याची कबुलीच त्यांनी दिली.

मेलोनी यांचं राजकारण रशियाला न दुखावण्याचं आहे आणि इस्रायलसमर्थक अमेरिकेलाही त्या सांभाळू पाहातात, हे उघड आहे. त्यामुळेच अक्षरश: चोरासारखं रशियाच्या दालनाचं उद्घाटन व्हेनिस बिएनालेच्या जार्दीनी भागात मंगळवारीच उरकण्यात आलं. बिएनालेचे यंदाचे पूर्वदिन ( प्रिव्ह्यू डेज) ६ ते ८ मे असे ठरलेले असूनसुद्धा रशियासाठी नियम मोडला गेला. हाच नव्हे; तर व्हेनिस बेटाच्या आकाशात एकही विमान नको, हा ऐन दुसर्‍या महायुद्धातही पाळला गेलेला (तेव्हाचा अलिखित, आता लिखित ) नियमही रशियाच्या देशदालनाला सुरक्षा पुरवण्यासाठी म्हणून मंगळवारी संध्याकाळभर घिरट्या घालणार्‍या ड्रोनमुळे जरासा मुरडला गेला. विशेषत: व्हेनिस आणि इटलीच्या कलाबाजारावर रशियन धनिकांचा किंवा

पुतिन यांच्या मर्जीतल्या ऑलिगार्क धेंडांचा वरचष्मा असल्याची कुजबुज एरवी असतेच, ती खरी वाटावी इतकं रशियाचं ‘संरक्षण’ व्हेनिस बिएनालेत यंदा सुरू आहे.

आफ्रिका, महिला यांची यंदाच्या बिएनालेवर छाप

’ रीना सैनी कलाट, हिमाली सिंग, सोहराब हुडा, अमर कन्वर, अनिश कपूर, नलिनी मलानी… शिवाय ‘इंडिया पॅव्हिलियन’मधले आणखी पाच दृश्यकलावंत मिळून दहा भारतीयांचा समावेश यंदाच्या व्हेनिस बिएनालेत असला तरी प्रभाव दिसतो आहे तो आफ्रिकेचा आणि महिला दृश्यकलावंतांचा. यंदाच्या ६१ व्या महाप्रदर्शनाच्या दिवंगत गुंफणकार कोयो कुओ या आफ्रिकी कलेच्या पुरस्कर्त्या आणि सिनेगलच्या रहिवासी. त्यांनी अकाली निधनापूर्वीच काही सहकार्‍यांसह १०५ दृश्यकलावंत आणि पाच कलासमूह यांची निवड मध्यवर्ती प्रदर्शनासाठी केली, त्यांत आफ्रिकेच्या किंवा अश्वेेतवर्णीयांना संधी अधिक मिळाली आहे. कोयो यांनी या बिएनालेची मध्यवर्ती कल्पनाच ‘इन मायनर कीज’ (याचं अतिढोबळ भाषांतर – ‘किनर्‍या सुरांत’) अशी मांडल्यामुळे महिलांना इथं प्राधान्य असणार हेही स्पष्ट झालं होतं. ’ महत्त्वाचं म्हणजे, व्हेनिस बिएनालेवरचा युरोपीय ताबा जणू पुसला जातो आहे, तो आशियाई, आफ्रिकी, लॅटिन अमेरिकी देशांकडे सरकतो आहे, हे २०१५ पासून दिसू लागलेलं चित्र आता पक्कं झालं आहे. कोयो कुओ या व्हेनिस बिएनालेच्या १८९५ पासूनच्या इतिहासातल्या पहिल्याचआफ्रिकी महिला गुंफणकार. त्यांच्या आधी २०१५ मध्ये ओक्वी एन्वेझर हे मूळ आफ्रिकी गुंफणकार होते आणि त्यांच्यामुळे इब्राहीम महामा आणि सॅमी बालोजी यांसारख्या तेव्हाच्या तरुणांना व्हेनिस बिएनालेत संधी मिळाली होती.