भ्रष्टाचारी. युद्धखोर, पाताळयंत्री अशी प्रतिमा असूनही ‘लोकशाही मार्गा’ने सत्तापदी कायम राहाणार्‍या आणि गेली तीन वर्षं युक्रेनचा घास घेऊ पाहाणार्‍या व्लादिमीर पुतिन यांचा रशिया व्हेनिसच्या ‘आर्ट बिएनाले’त वादाचा विषय ठरला. हा वाद सामोपचारानं सुटेल याची कोणतीही आशा न दिसल्यामुळे आता सहा जणांच्या परीक्षक मंडळानंच एकगठ्ठा राजीनामा दिला आहे.

‘आम्ही कलेला स्वायत्त मानतो, त्यामुळे देश कोणता यापेक्षा कलावंत आणि कलेकडे पाहतो’ अशी भूमिका घेणार्‍या आयोजकांना ही चपराक आहेच. पण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनाही ‘याच्याशी सरकारचा काही संबंध नसतो’ अशी सारवासारव करावी लागत आहे. ही ‘स्वायत्तता’ खरोखर जपली जाऊन रशियाचं दालन सुरू झालंच, तर काहीजण हुल्लडबाजी करून ते बंद पाडतील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे बहुधा यंदाच्या व्हेनिस बिएनालेसाठी निवड झालेले कलावंतच आता यातून अंग काढून घेतील, अशी अपेक्षा अनेकांना असल्याचं इटालियन वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे.
इतक्या ऐनवेळी अख्ख्या परीक्षक मंडळानं राजीनामा दिल्यामुळे यंदाच्या पुरस्कारांवर सावट आहेच, पण बिएनालेच्या आयोजकांनी अद्याप याबद्दल मौन पाळलं आहे. परीक्षकांच्या राजीनाम्याबद्दल अधिकृत वाच्यताच आयोजकांनी केलेली नाही.

रशियानं फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, त्या खेपेच्या व्हेनिस बिएनालेत रशियाच्या दालनासाठी निवड झालेल्या कलावंतांनीच ‘आम्ही आमचं प्रदर्शन बंद करत आहोत’ असा निर्णय घेऊन तो अमलात आणला. मग २०२४ मध्ये रशियाचं बांधीव दालन ‘दुरुस्तीसाठी बंद’ ठेवण्यात आल्याचं रशियानंच स्वत:हून जाहीर केलं. यंदा ही ‘दुरुस्ती’ झाल्याच्या हिशेबानंच जून २०२५ पासून रशियानं २०२६ च्या व्हेनिस बिएनालेसाठी प्रदर्शन नियोजकाची निवड केली. मग कलावंतांचीही नावं जाहीर झाली. तेव्हापासूनच ‘रशिया नको’ हा सूर तापू लागला आणि गेल्या तीन महिन्यांत तो वाढला. ‘इन्स्टाग्राम’वर व्हेनिसमधलं हे संभाव्य रशिया दालन, तसंच इस्रायलचं दालन ‘आपणच बंद पाडू या ’ अशी आवाहनं सुरू झाली, त्यांना प्रतिसादही मिळू लागला. इस्रायल व अमेरिकेनं इराणवर लादलेल्या युद्धाबाबत शांततेची भूमिका घेऊनसुद्धा रशियाची प्रतिमा युद्धखोर अशीच आहे, हेच व्हेनिसमध्ये येत्या आठवड्यात- पाच मे किंवा नऊ मे रोजी – रशियन पॅव्हिलियनबाबत घडणार्‍या घडामोडींतून आणखी प्रकर्षांनं दिसेल. शिवाय, इस्रायलच्या पॅव्हिलियनचं काय होणार, हाही प्रश्न आहेच!

नामुष्कीची कुणकुण होती ?

व्हेनिस आर्ट बिएनाले दर दोन वर्षांनी भरते, त्या प्रत्येक खेपेला जगातल्या एका ज्येष्ठ दृश्यकलावंताला ‘कारकीर्द गौरव पुरस्कार’, तसंच इथं जी देशोदेशींची कला-दालनं बिएनालेपुरती उभारली जातात त्यांतून निवड करून सर्वोत्कृष्ट दालनाला (पॅव्हिलियन) पुरस्कार, शिवाय त्या त्या खेपेच्या एका सर्वोत्कृष्ट कलावंताला पुरस्कार अशा ‘गोल्डन लायन’ने गौरवण्यात येते. पण यंदा ही निवडच होणार नाही. परीक्षकांनी इतक्या ऐन वेळी राजीनामा दिल्यामुळे दुसरे परीक्षक मंडळही नेमता येणार नाही. या नामुष्कीची कुणकुण आधीच संबंधितांना सुमारे दोन महिने आधीपासून लागली होती, कारण तेव्हा ‘यंदाच्या आर्ट बिएनालेच्या नियोजक व आफ्रिकन कला-संघटक कोयो कुओ यांच्या निधनामुळे’ असे कारण देऊन यंदा कारकीर्द गौरव पुरस्कार दिलाच जाणार नाही, असं जाहीर झालं होतं.