आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका अशा खंडांमधले नवे दृश्यकलावंत आता युरोपीय ‘मॉडर्न आर्ट’चं अनुकरण करत नाहीत- हे सारेजण आता आपापल्या पद्धतीनं कलाकृती करतात; महत्त्वाचं म्हणजे या कलाकृतींना ठराविक मोजपट्ट्या न लावता, त्यामागची भावना पाहून मोठमोठ्या जागतिक महाप्रदर्शनांमध्ये अशा कलाकृतींची निवडही होते, हे यंदाच्या ‘व्हेनिस बिएनाले’नं पुन्हा एकदा आणि अत्यंत ठामपणे सिद्ध केलं आहे.
‘जागतिक दक्षिण’ म्हणवणाऱ्या या विकसनशील देशांचा इतिहास वसाहतवादाचा. साहजिकच युरोपीय प्रभाव त्या देशांतल्या कलाशिक्षण संस्थांवर अटळ होता. तो प्रभाव झुगारून देऊन स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न भारतीय कलावंतांनी रूपाच्या किंवा शैलीच्या वाटेनं केला (कारण भारताला अजिंठ्यासारखी प्राचीन चित्रशैली आहेच, हे अमृता शेरगिल- पुढे नंदलाल बोस आदींनी ठसवलं होतं) ; पण आशय मात्र बदलला नाही… ते काम पुढल्या काळात आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या देशांतल्या केलं.
या देशांनी – त्यातही अमेरिका कधीही घास घेईल अशी रास्त् भीती तेव्हाही वाटणाऱ्या लॅटिन अमेरिकन देशांनी युरोपीय कलेपासून फारकत खण्यासाठी संस्थात्मक उभारणीही सुरू केली. ब्राझीलची साओ पावलो बिएनाले १९५१ पासून सुरू झाली तीच मुळी ‘व्हेनिसला उत्तर’ देण्याच्या ईर्षेनं. आपल्या देशातही मुल्कराज आनंद यांच्या द्रष्टेपणामुळे १९६८पासून ‘इंडिया ट्रिएनाले’ (हिंदी वळणाचा आणि आजतागायत रूढ असलेला उच्चार ‘त्रिनाले’) सुरू झाली. पण २००५ नंतर ते आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांना खासगीकरणाचं महत्त्व फारच पटल्यामुळे २००५ पासून हा भारतीय उपक्रम बंद पडला. मात्र हळूहळू आपापल्या वातावरणातल्या विषयांना दृश्यकलेत आणण्याचं काम भारतीय चित्रकारही मोठ्या प्रमाणावर करू लागले. तरीही, आजदेखील भारतीय कला थेट आशय मांडण्यात आफ्रिका वा दक्षिण अमेरिकेसारख्या खंडांतल्या लहानसहान देशांपेक्षाही कमी पडते, हे सत्य व्हेनिस बिएनालेत हल्ली वारंवार दिसतं. अर्थात, याच व्हेनिस बिएनालेचं लक्ष आता आफ्रिकन, दक्षिण अमेरिकी किंवा अन्य देशांमधल्या कलेच्या आशयाकडे जाऊ लागलं आहे. हा आशय कधी फक्त आपापल्या देशामधल्या, स्वत:ला दिसलेल्या परिस्थितीतून आलेला असेल किंवा तो जागतिकीकरणानंतर एकंदर जगभरच्या माणसांविषयीचा असेल… पण हा विविधांगी आशय निश्चितपणे लक्ष वेधून घेतो आहे.
त्यामुळेच आता जागतिक दक्षिणेचा अदृश्य झेंडा व्हेनिस बिएनालेसारख्या तद्दन युरोपीय महाप्रदर्शनांवर फडकलेला दिसतो. सोहराब हुडा हा भारतीय चित्रकार भारताल्या आर्टस्कुलांच्या हिशेबानं ‘फारच कच्चा’ वाटेल- कारण त्याच्या चित्रांत हुबेहूबपणा किंवा सफाई नाही. पण त्याची चित्रं अस्सल आशयाची असल्यामुळे इथे- व्हेनिस बिएनालेत जगाचं लक्ष त्याच्याकडे जातंय. सोहराबनं भिंतीवर भरपूर चित्रांमधून आत्मपर तपशील मांडला आहे, ती आज तिशीत असणाऱ्या कुणाचीही गोष्ट असू शकते. पण भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीबद्दलची सोहराबची समज त्यानं खोक्यांच्या सर्व बाजूंनी चित्रं लावून मांडली आहे- या खोक्यांवर नेहरू आहेत, आंबेडकर आहेत आणि ओबीसींना सवलती मिळू नयेत म्हणून ‘मंडलविरोधी आंदोलना’त स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न करणारा राजीव गोस्वामीही आहे.
गाझामध्ये जन्मलेला आणि तिथेच वाढलेला मोहम्मद जफा हा चित्रकार गाझातल्या वस्त्यांची चिकटचित्रं (कोलाज) करतो. त्यासाठी मिळेल ते- लोकांनी फेकून दिलेलं ‘मटेरिअल’ तो वापरतो. ही त्याची चित्रं यंदा व्हेनिस बिएनालेच्या मध्यवर्ती प्रदर्शनात आहेत. फार कशाला, जर्मनीनं व्हेनिसमध्ये मांडलेल्या देश-दालनात हेन्रिक (हेनरिक) नाउमान हिच्यासह मूळची व्हिएतनामची पण आता जर्मनीवासी चित्रकार सुंग तिऊ हिचाही समावेश आहे. अशाच प्रकारे गेल्या खेपेला (२०२४) व्हेनिसमधल्या फिनलंडच्या देश-दालनात मूळची भारतीय चित्रकार विधा सौम्या हिचा समावेश होता. अवघ्या दहा वर्षांपूर्वी डोळे दिपवून टाकणाऱ्या, प्रचंड आकाराच्या सफाईदार मांडणशिल्पांचा बोलबाला अधिक असायचा, तो दिमाख आता मागे पडून चित्रकारांना काय सांगायचंय, याकडे लोकांचं लक्ष जाऊ लागलं आहे.
जागतिक दक्षिणेतल्या देशांकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, तोवर युरोपीय शहरांमध्ये या विकसनशील देशांची कला लक्ष वेधून घेत राहील!
