‘त्यांच्या कलाकृती व्हेनिस बिएनालेतही प्रदर्शित झाल्या होत्या’, असे शब्द एकदा का बायोडेटात आले, की चित्रकारांचं महत्त्व वाढतं, एवढंच कारण नाही. व्हेनिसची बिएनाले १८९५ पासूनची म्हणूनच ती महत्त्वाची असा भोळसट हिशेब तर टाळणंच बरं. तरीही व्हेनिस बिएनालेला ‘दृश्यकलेचं ऑलिम्पिक’ म्हणून नावाजलं जातं. या ऑलिम्पिकमधला खेळ आता पदकांविनाच खेळला जाणार, अशी भीती परीक्षक मंडळाच्या राजीनाम्यामुळे यंदा आहे, हे खरं. राजीनाम्यांनंतर इस्रायलच्या बाजूनं प्रचाराचा खेळ सुरू झाल्याचंही दिसतंय. पण तेवढ्यानं व्हेनिसच्या बिएनालेचं महत्त्व कमी होतं- किंवा वाढतं का?
नाही, हेच इथं व्हेनिस शहरात वाढलेली कलाप्रेक्षकांची गर्दी सांगते आहे, कलेचं हे ‘ऑलिम्पिक’ पाहाण्यासाठी सहा महिन्यांत तिकिटं काढून सरासरी सहा लाख ते आठ लाख कलाप्रेमी येतात. ‘व्हेनिस बिएनाले’ नावाची जी काही संस्था आहे, तिनं भरवलेल्या किंवा मान्य केलेल्या उपक्रमापेक्षा निराळे उपक्रम म्हणून या शहरात अनेक प्रदर्शनं त्या सहा महिन्यांत सुरू असतात. कलेच्या ऑलिम्पिकमधला चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, व्हीडिओ-कलाकृती, परफॉर्मन्स आर्ट किंवा क्षण-जीवी कला या सार्यांचा खेळ अनेकांचा हुरूप वाढवणारा, अनेकांची चित्तं थरारवणारा , अनेकांना तुल्यबळांशी सामना केल्याचं समाधान देणारा असतो.
उदाहरणार्थ यंदा इथं क्षण-जीवी कलेतल्या ज्येष्ठ कलावंत मरीना अब्रामोविच यांचं प्रदर्शन मंगळवारी सुरू झालं, तर व्हीडिओ- मांडणशिल्प कलेतल्या जागतिक कीर्तीच्या आणि भारतातल्या सर्वांत ज्येष्ठ दृश्यकलावंत नलिनी मलानी यांचं यांचं प्रदर्शन आजपासून सुरू होईल. ते ‘किरण नाडर म्यूझियम ऑफ आर्ट’नं भरवलंय, तर अब्रामोविच यांच्या प्रदर्शनाचे आयोजक चिनी आहेत. या दोघी भारतीय वंशाचे ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर, तर दिल्लीचे आणि संथ लघुपटांसारख्या व्हीडिओ कलाकृती करणारे कपूर यांच्याच वयाचे भारतीय कलावंत अमर कन्वर यांच्या कलाकृती इटालियन संग्रहालयांतर्फे इथं प्रदर्शित होत आहेत.
कोरियन अमूर्त चित्रकार ली युफान आणि दिवंगत इटालियन चित्रकार अलिगेरो बोएत्ती यांची प्रदर्शनं तर एकाच दालनात ( सान मार्को आर्ट सेंटर) पाहाता येतात. ही अशी तुल्यबळ प्रदर्शनं अनेक… ती पाहायला आठवडाही पुरत नाही. त्यात यंदा राजकारणाच्या चर्चा भरपूर. निदर्शनांची शक्यता आहेच. तरीही लोकांचा कल कलाकृती पाहाण्याकडेच असेल, असं आजच्या एका प्रदर्शनाच्या उद्घाटन- प्रसंगी दिसलं. जोवर हा उत्साह आहे, तोवर ‘कलाबाजार’, ‘राष्ट्रीय कलादालनांची छुपी राजकीय स्पर्धा’ अशी कितीही नावं ठेवली तरी व्हेनिस बिएनालेच महत्त्वाची ठरत राहील. याचं कारण, कलेच्या वाटेत जे जे काही येतं, त्याला घेऊन पुढे जाण्याची आणि उत्तमोत्तम कलाकृती दाखवण्याची या बिएनालेतल्या सार्याच – औपचारिक किंवा अनौपचारिक – सहभागींनी जपलेली वृत्ती!
देशांमधलं प्रचारयुद्ध
व्हेनिस बिएनालेत सर्वोत्कृष्ट देश-दालन, उत्कृष्ट कलाकृती असे पुरस्कार यंदा दिले जातील, पण उशीरा- नोव्हेंबरात, नवे परीक्षक नेमल्यानंतर. अमेरिकेतल्या ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या इंटरनेट आवृत्तीनं ‘ हे परीक्षक लोक इस्रायली, रशियन कलावंताची निवड करू इच्छित होते… त्यांना या दोन देशांतले कलावंत निवडायचे नाहीत, असं ( याच देशांना यंदा दालन उभारण्याची संधी देणार्या ) आयोजकांनी सांगितलं, म्हणून तर परीक्षक दुखावले गेले’ – अशी कारणकथा फक्त इस्रायली स्रोताच्या हवाल्यानं रचली आहे. त्यावर सोमवारी ब्रिटनच्या गार्डियन या वृत्तपत्रानं अनिश कपूर यांची प्रतिक्रिया नोंदवलीय – ‘‘दोनच का? तीन देशांच्या समावेशाला परीक्षकांचा आक्षेप हवा होता- अमेरिकासुद्धा युद्धखोर आहेच’’ असं कपूर म्हणतात !
गाझा आणि ‘एलजीबीटी’ साठी…
‘रशिया असेल तर आम्ही नाही’ अशा फणकार्यातून दक्षिण आफ्रिका या देशानं यंदा व्हेनिसला देश-दालन उभारणं नाकारल्यावर, त्या दालनासाठी आधीच निवडली गेलेली कलावंत गॅब्रिएले गाझेल हिच्या कलाकृती आता एका चर्चमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. भव्य चर्चमध्ये एकंदर तीन व्हीडिओ कलाकृती आहेत, त्या सार्यांत एकापाठोपाठ अनेक वंशाच्या महिला किंवा पारलिंगी दिसतात. त्यांचे चेहरे शोक, चीड, हताशा, निग्रह अशा निरनिराळ्या भावना दाखवणारे… यापैकी एका कलाकृतीतला विलापासारखा ध्वनी चर्चभर घुमत राहील… विलाप, शोक हेच तीन्ही कलाकृतींचं सूत्र. मोठया कलाकृतीतला विलाप गाझासाठी, तर अन्य दोन कलाकृतींतला शोक ‘एलजीबीटी’ तसंच महिलांवर होणार्या लैंगिक वा अन्य छळाविरोधात आहे.
‘व्हेनिस बिएनालेचं महत्त्व काय, हा प्रश्न पडूच नये… या महाप्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात, जणू अख्ख्या कलाजगताचा गुरुत्वमध्य असतो व्हेनिस म्हणजे ! – सिग्रिड कर्क ‘असोसिएशन फॉर विमेन इन आर्ट’ या संस्थेच्या प्रमुख संचालक
