व्हेनिस बेटावर ९ मे पासून सुरू होणार्या ‘६१ व्या आंतरराष्ट्रीय द्वैवार्षिक महाप्रदर्शना’त – अर्थात ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये – यंदा विक्रमी ९९ देशांची ‘पॅव्हिलियन’ आहेत. या प्रत्येक पॅव्हिलियनमध्ये त्या- त्या देशानं भरवलेली छोटेखानी कलाप्रदर्शनं असतात. यातून त्या देशाची आजची दृश्यकला (आधुनिक, समकालीन कला) किती पुढे गेली आहे, याचा अंदाज येत असतो. समाधानाची बाब म्हणजे यात यंदा भारतही आहे!
यापूर्वी भारतीय वंशाचे किंवा भारतात राहाणारेही अनेक चित्रकार या प्रतिष्ठेच्या महाप्रदर्शनात स्थान मिळवून गेले, पण ‘इंडिया पॅव्हिलियन’ हे या बिएनालेच्या १३१ वर्षांच्या इतिहासात फक्त २०१९ मध्ये, एकदाच होतं. त्यानंतर सात वर्षांनी भारत पुन्हा एकदा ‘व्हेनिस बिएनालेचा भाग ठरतो आहे. युरापातले ४५ देश इथे आहेतच पण बहुतेक सार्या अरब देशांचीही ‘पॅव्हिलियन’ आहेत. त्यातही इस्रायल, इराण, पॅलेस्टाइन, युक्रेन, रशिया अशा एकमेकांशी संघर्ष करत असलेल्या देशांनी ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये आपापली अभिव्यक्ती मांडण्याची संधी न सोडणं, हे यंदाचं वैशिष्ट्य ठरेल. अनेकांनी इस्रायल आणि रशिया हे ‘युद्धखोर’ देश म्हणून त्यांच्या समावेशाला आक्षेप घेतला, वादही झाले, पण ते शमवून यंदाची बिएनाले पुढल्या आठवड्यात सुरू होईल. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना ६ मे पासून दररोज ‘बिएनाले’ची खबरबात या वृत-स्तंभात वाचायला मिळेल.
व्हेनिसच का महत्त्वाचं?
‘कालव्यांचं शहर’ म्हणून ओळखल्या जाणार्या व्हेनिसमध्ये देशोदेशींच्या चित्रकला- शिल्पकलेची तात्पुरती दालनं (पॅव्हिलियन्स) उभारून एक महाप्रदर्शन ३० एप्रिल १८९५ रोजी सुरू झालं, या घटनेला कालच्या शुक्रवारी १३१ वर्षं पूर्ण झाली असली तरी, आजतागायत महायुद्धकाळाचा अपवाद वगळता दर दोन वर्षांनी हे महाप्रदर्शन व्हेनिसमध्ये भरवलं जातं. हा सर्वांत जुना आणि सातत्यानं काळाबरोबर वाढलेला कला उपक्रम ठरतो. हे जागतिक प्रदर्शन द्वैवार्षिक म्हणजे इंग्रजीत ‘बायएनिअल’- पण प्रदर्शन इटलीत असल्यानं त्याचा उच्चार ‘बिएनाले’ असा होतो. या ‘व्हेनिस बिएनाले’च्या स्थापनेनंतर कैक वर्षांनी जगाच्या अन्य भागांतही अशी द्वैवार्षिक महाप्रदर्शनं सुरू झाली. पण प्रत्येक देशाचा मांडव, त्याखेरीज एक मोठं मध्यवर्ती प्रदर्शन, कालव्यांच्या बेटावर फक्त पायी चालणारे किंवा बोटींतून फिरणारे चित्ररसिक हे दृश्य गेली १०० वर्षं तसंच्या तसं आहे! उपक्रमाची कीर्ती वाढल्यामुळे बेटावरच्या प्रत्येक मोठ्या संस्थेत आणि काही आणखी काही खासगीरीत्या भरवलेली प्रदर्शनं… ही सारी खासियत व्हेनिसचीच!
भारतातर्फे कोणकोण?
मूळचा चेन्नईचा पण आता बेंगळूरुवासी अल्वार बालसुब्रमणियन, जन्मानं हैदराबादचा पण आता दिल्लीकर झालेला आसिम वकीफ, दिल्लीच्याच सुमाक्षी सिंग, लडाखचे स्कार्मा सोनम ताशी आणि कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुद्दाम स्टुडिओ थाटणार्या रंजनी शेट्टार यांची निवड पॅरिसवासी- पण मूळचे भारतीय गुंफणकार डॉ. अमीन जाफर यांनी यंदाच्या ‘इंडिया पॅव्हिलियन’साठी केली आहे.
