‘व्हिलेज लाइफ’ या शीर्षकाची चित्रं भारतात तर गेल्या १०० वर्षांपासून होताहेत, किंवा संगीत आणि चित्रकला असा एकत्रित प्रयोगसुद्धा मुंबईत १९८० च्या दशकातच झालाय… भीमसेन जोशी ‘एनसीपीए’मध्ये गात असताना एम. एफ. हुसेन यांनी चित्र रंगवणं आणि संगीत ऐकणं हा तात्कालिक अनुभव असल्यामुळे हुसेन यांनीच अखेर अख्खं चित्र पुन्हा पांढरं करणं, असं त्या प्रयोगाचं स्वरूप होतं. शिवाय परंपरेतून आलेल्या चित्रांना आपल्या वारली कला, गोंड कला यांमध्ये स्थान आहेच. पण इथं व्हेनिसमध्ये मात्र या संगीत, परंपरा, ग्रामजीवन या साऱ्याचा ‘आत्ता’शी संबंध जोडणारी कला दिसते आहे.

व्हेनिस बिएनाले या महाप्रदर्शनाची यंदाची ६१ वी खेप आता केवळ दोन मुख्य स्थळांवरच नव्हे तर शहरभरच्या सुमारे शंभर लहानमोठ्या प्रदर्शनांतून सर्वांसाठी (सशुल्क- काही प्रदर्शनांसाठी तर आणखी निराळी तिकिटं काढून) सुरू झाली आहे. इब्राहीम महामा या आफ्रिकेतल्या घाना देशाच्या आणि २०१५ पासून जगप्रसिद्ध झालेल्या मांडणशिल्पकारानं व्हेनिसच्या गॅलेरिआ बॅरोव्हिए या लहानशा खासगी कलादालनात त्याच्या तमाले या गावात मातीची रांजणवजा भांडी बनवणाऱ्या बायकांचं आयुष्य अवघ्या काही चिकटचित्रांतून – ‘फोटोकोलाज’मधून- मांडलं आहे. रांजणांसाठी नदीकाठची मऊ लाल माती मिळणंच हल्ली मुष्किल आहे कारण नद्या आटताहेत, मातीच बदलते आहे. या बायकांना माती लांबून आणावी लागते, त्यात त्यांची पाठ मोडून निघते, हे वास्तव दाखवण्यासाठी महामानं ही फोटोकोलाज करताना नद्यांचे नकाशेही वापरले आहेत. त्याखेरीज ३० इंच बाय ४५ इंच आकाराच्या ‘पोलरॉइड’ फोटोंमध्ये या काही महिलांच्या पाठीच्या कण्यांचे एक्सरे आहेत. ते सारं पाहिल्यानंतर, याच गॅलरीच्या दर्शनी भागात ‘मुरानो ग्लास’च्या साथीनं मांडलेले फुटक्या रांजणांचे तुकडे निव्वळ ‘छान दिसणारे’ न वाटता, त्या महिलांच्या उन्मळलेल्या आयुष्याची साक्ष देणारे भासतात !

गरीब देशांतल्या ग्रामजीवनातही आज बराच शहरी कचरा असतो… वस्तू दुय्यम दर्जाच्या असतात, त्या मोडतात. असे फाटके टायर, प्लास्टिकच्या फुटक्या होड्या, फाटके कपडे एकत्र करून पोर्तो रिको या कॅरिबियन देशातले डॅनिएल लिंड-रामोस हे मोठमोठी शिल्पं उभारतात. ती शिल्पं जणू कुठल्याशा ग्रामदैवतासारखी वाटतात, पण प्रत्यक्षात ग्रामीण जीवनाचा इस्कोट त्यांतून दिसत राहातो.

मिरवणुकीची परंपरा प्रत्येक संस्कृतीत आहे. यंदाच्या व्हेनिस बिएनालेच्या दिवंगत गुंफणकार कोयो कुओ यांनी ‘पोएट्री कॅराव्हान’ ही कल्पना मांडली होती, ती इथंही पहिल्या दिवशी जिवंत ठेवण्यात आली. बिएनालेच्या प्रांगणभर सात मंच उभारून, निमंत्रित कवींना तिथं कवितावाचनाची संधी- पण या मंचापासून त्या मंचापर्यंत चालत जाताना कुणीही कुठलीही कविता म्हणण्याची मोकळीक, असं या मिरवणुकीचं स्वरूप होतं. किंवा अझरबैजानच्या देश-दालनात गालीचे विणण्याची परंपरा कालौघात कशी विरून जाते आहे याचा प्रत्यक्ष स्पर्शच दालनभर पसरलेल्या गालीचावरलं विरघळतं डिझाइन पाहाताना, प्रेक्षकांच्या अनवाणी पायांना होतो. या गालीचावरून पुढं गेल्यावर एक अंधारी खोली. तिथं तुमच्या मनातला प्रश्न ओळखण्याची थेरवादी परंपरा इलेक्ट्रॉनिक्स आणि एआयच्या मदतीनं फ्रेजिवंत होते.

संगीताचा मुबलक वापर यंदाच्या व्हेनिस बिएनालेत आहे. रशियानं स्वत:चं दालन इथं तीव्र विरोधावर टिच्चून उभारलं, त्यात खोटी फुलं ठेवून काही निवडक प्रेक्षकांना ती भेट दिली आणि या दालनात फारशा कलाकृतीच नसल्यामुळे, निम्म्याहून अधिक भाग ‘लाइव्ह डीजे’ आणि त्याच्या तालावर आल्यागेल्याला नाचण्यासाठी मोकळा ठेवला. पण बिएनालेचे प्रेक्षक काही या इथं- रशियाच्या तालावर नाचायला तयार नव्हते. चार टाळकी नाचत होती ती म्हणे कलावंतांपैकीच होती. हा झाला संगीताचा आजच्या कलेपेक्षाही, आजच्या राजकारणासाठी वापर. पण व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक कला, प्रकाशाचा थेट वापर करणारी कला अशा ‘नवमाध्यमां’त काम करणारा फ्रेंच दृश्यकलावंत (न्यू मीडिया आर्टिस्ट) फिलीपे पारेनो यानं हलके सूर आणि दणकेबाज ताल यांनुसार हलणारं एक झुंबरच व्हेनिसमधल्या पालाझ्झो डिएडो इथं बर्ग्युआनो न्यासातर्फे भरवल्या गेलेल्या प्रदर्शनात मांडलं होतं. शिवाय, केवळ आलापांचा वापर आजच्या दमनग्रस्तांची स्थिती दाखवण्यासाठी गॅब्रिएले गोलिॲथ हिनं केलेला आहेच.