विरोधकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली नसताना किंवा घोषणाबाजी केली नसतानाही सभापती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच ते काही मिनिटांतच अचानक तहकूब केले.

कामकाज सुरू होताच नायडू यांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन आठवडय़ांत राज्यसभेत काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. आपण येथे जमतो, हस्तांदोलन करतो, पण काम काहीच करीत नाही. याने लोकांमध्येही नाराजी आहे, असे नायडू म्हणाले. पीएनबी घोटाळा, दिल्लीतील मार्केट सिलिंग प्रकरण, कावेरी प्रश्न आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याचा मुद्दा यावर विरोधकांनी बोलण्यासाठी अनुमती मागितली आहे आणि ती दिलीही गेली आहे. पण गदारोळामुळे चर्चाच होत नाही. कृपया माझ्या आणि लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असे नायडू म्हणाले.

तेव्हा काँग्रेसचे खासदार सत्यव्रत चतुर्वेदी उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘सभापती महोदयांच्या भूमिकेशी कुणीही असहमत असण्याचे कारण नाही. जे मुद्दे त्यांनी सांगितले त्यावर चर्चाही आवश्यक आहे. पण तरीही ज्या गदारोळाबद्दल आपण नाराजी व्यक्त करीत आहात तो प्रथमच घडत आहे का? तुमच्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीत असा गदारोळ तुम्ही कधीच पाहिला नव्हता का,’’ चतुर्वेदी यांनी मागे महिनाभर कामकाज विरोधकांनी (भाजपने) चालू दिले नव्हते, याचे स्मरण करून दिले.

त्यावर नायडू उद्गारले, ‘‘कुणीतरी चुका केल्या म्हणून आम्हीही चुकीचेच वर्तन करू, हा दृष्टीकोन बरोबर नाही.’’ त्यानंतर नायडूंनी तडकाफडकी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याने सदस्य अवाक झाले.