व्यंकय्या नायडू यांचे विरोधकांना आवाहन
अरुणाचल प्रदेशात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आणि रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांची आत्महत्या या प्रश्नांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेची सरकारची तयारी आहे, असे संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथे स्पष्ट केले. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाजात व्यत्यय आणू नये, असे त्यांनी सूचित केले.
अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट आणि रोहित वेमुलाची आत्महत्या या प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नायडू यांनी हे स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेश अथवा वेमुला या प्रकरणात सरकारचा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांकडून सभागृहात हे दोन प्रश्न मांडून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या बद्दल नायडू म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडू द्यावे की नाही, हा काँग्रेसचा प्रश्न आहे.