PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी ‘दोनों फेल हैं…’ ; राहुल गांधींची टीका

‘पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बिघडलेले’

संग्रहीत

देशात करोन व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे करोना रूग्णांना आपला जीव गमावावा लागत आहे. या लाटेत रूग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी गरज आहे. पीएम केअर फंड अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटर देण्यात आले होते, परंतु व्हेंटिलेटरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी हात वर केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरीच समानता आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे.’

गेल्या आठवड्यात, भोपाळच्या सर्वात मोठ्या हमीदिया रुग्णालयात खराब व्हेंटिलेटरचे प्रकरण समोर आले होते. इथल्या डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला एक पत्र लिहिले, त्यात स्पष्ट केले होते की, पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बिघडलेले आहेत.  ऑक्सिजनचा प्रवाह होत नाही, दबाव निर्माण होत नाही, मशीन चालू असतानाचं बंद पडते. अशा परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवणे अवघड आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये केंद्राकडून व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, काही सुटे भाग न आल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पडून होते. या मुद्द्यावरून भाजपा आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेसकडून या एकूणच व्हेंटिलेटर पुरवठा प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “पीएमकेअर फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालय आणि नाशिक महानगर पालिकेला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये घोटाळा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पीएम केअर फंडातून राज्यभरात पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करा”, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती.

आणखी वाचा- देशावर घोंगावतय मृत्यूचं वादळ! करोनाबळींचा आकडा पावणेतीन लाखांवर

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा संताप

केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची खरेदी केली आहे. मात्र हे व्हेंटिलेटर खराब असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय आरोग्य खात्याकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“भारत सरकारने राज्याला पीएम केअर फंडातून १९०० व्हेंटिलेटर दिले आहेत. हे व्हेंटिलेटर लावण्याची आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र या व्हेंटिलेटरर्समध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या तांत्रिक अडचणीमुळे रुग्णांच्या जीवाल धोका निर्माण होऊ शकतो”, असं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ventilator from the pmcares fund and narendra modi both failed criticism of rahul gandhi srk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या