नवी दिल्ली : म्यानमारमधील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांच्याविरुद्धच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने धक्का बसल्याची प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. तेथील सरकारने कायद्याचे समानत्व आणि लोकशाही प्रक्रियेतील मूल्यांचे पालन करावे, असे भारताने मंगळवारी म्हटले आहे.

सू ची यांना सोमवारी चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेचा कालावधी नंतर दोन वर्षे इतका करण्यात आल्याचे सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्तात म्हटले होते. सू ची यांच्यावर लोकांना भडकाविल्याचा तसेच करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.  या घटनेबाबत भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, हा निकाल अस्वस्थ करणारा आहे. शेजारी देश म्हणून भारताने नेहमीच तेथील लोकशाही प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे. लोकशाही मूल्यांचे हनन करणारी कोणतीही घटना ही चिंतेचा विषय ठरते.