वृत्तसंस्था, नवी दिल्ली : कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर घालण्यात आलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या, गुरूवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय उचलून धरला होता. त्याला आव्हान देत काही विद्यार्थिनी आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी २३ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. न्या. गुप्ता हे रविवारी निवृत्त होणार असून त्यापूर्वी निकाल येणे अपेक्षित आहे. १० दिवस चाललेल्या सुनावणीमध्ये हिजाबला बंदी केल्यामुळे मुस्लिम महिलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. ५ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने काढलेल्या आदेशावर आक्षेप घेण्यात आला. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. तर हिजाबला बंदी ही समानतेच्या तत्त्वावर घालण्यात आल्याचा दावा कर्नाटक सरकारच्या वकिलांनी केला. दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.