US Treasury Secretary Scott Bessent clarifies India’s role in global oil stability: आखाती देशातील युद्धादरम्यान रशियाकडून तेल आयात करण्यासाठी भारताला ३० दिवसांची सूट दिली आहे, असे विधान अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी केले होते. केंद्र सरकारच्या वतीने हे तेलनीतीचे यश मानले होते. त्यानंतर आता अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचे नवे विधान समोर समोर येत आहे. बेसेंट यांनी भारताचे कौतुक करताना भारत सहकार्य करणारा चांगला देश (Very good actor) असल्याचे म्हटले आहे. तसेच जागतिक इंधन बाजारपेठ स्थिर राहण्यासाठी रशियन कच्च्या तेलावरील निर्बंध आणखी कमी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
फॉक्स बिझनसेला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले, अमेरिकेने भारताला समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावरील रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी आधीच दिली आहे. आता आणखी बॅरलवरील निर्बंध मागे घेण्याबाबत आमचा विचार सुरू आहे.
आम्ही सांगतो तसे भारत करतो
स्कॉट बेसेंट पुढे म्हणाले, भारतीयांनी खूप चांगले काम केले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना रशियन तेल आयात करू नका, असे सांगितले होते. तसे त्यांनी केले. आता तात्पुरती सूट मिळण्यापूर्वी भारताने अमेरिकेच्या आधीच्या विनंत्याचे पालन केले होते.
“भारत आता अमेरिकन तेल आयात करणार होते. परंतु जगभरात आता तेलाची तात्पुरती तूट कमी करण्यासाठी आम्ही त्यांना रशियन तेल घेण्याची परवानगी दिली आहे”, असेही ते म्हणाले. इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मध्य पूर्वेतील संभाव्या तेलपुरवठा खंडित होण्याची चिंता निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले, ‘अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा क्षेत्रातील धोरणामुळे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा खेळता राहावा, यासाठी भारतातील तेलकंपन्यांना रशियातून तेलखरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट देण्यात येत आहे. या महिनाभराच्या सवलतीमुळे रशियाचा फार मोठा फायदा होणार नाही. कारण समुद्रामध्ये अडकून पडलेल्या तेलाच्या खरेदीचाच या व्यवहारामध्ये समावेश आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत अमेरिकेकडून तेलखरेदी वाढवेल, अशी अपेक्षा आहे. जागतिक ऊर्जाक्षेत्र आपल्याच प्रभावाखाली असल्याच्या इराणच्या प्रयत्नांना त्यामुळे यश येणार नाही.’
काँग्रेसने स्कॉट बेसेंट यांच्या विधानानंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भारत हा अमेरिकेचे म्हणणे ऐकतो, त्यामुळे तो चांगला देश आहे, अशा आशयाचे विधान बेसेंट यांनी केले आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आता अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहणार का? एका कमकुवत पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे अमेरिका उघडपणे असे बोलत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.
