भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.  त्यांनी चीनचे जॅक मा यांना श्रींमतीमध्ये मागे टाकले आहे. जॅक मा हे अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. मागच्या दोन दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दोन महत्वाचे टप्पे गाठले आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारातील भांडवली हिस्सा १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य सात लाख कोटीच्या पुढे गेले.

आता स्वत:हा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. शुक्रवारच्या व्यवहारात आरआयएलच्या शेअरने १,१०६.६५ ही सर्वकालीन उंची गाठली होती. जॅक मा यांच्याजवळ ४४ अब्ज अमेरिकन डॉलर तर मुकेश अंबानी यांच्याकडे ४४.३ अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. यावर्षी रिलायन्सच्या संपत्तीमध्ये ४ अब्ज डॉलरने वाढ झाली तर जॅक मा यांना १.४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

मुकेश अंबानी यांनी याआधी सुद्धा चिनी उद्योगपतीवर मात केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये अंबानी यांनी हुई का यान या चिनी उद्योगपतीला श्रीमंतीमध्ये मागे टाकले होते. तेलापासून ते मोबाईलपर्यंत मुकेश अंबांनी यांच्या कंपन्यांचे साम्राज्य विस्तारलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.