दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका आणि अनुभवी अँकर सरला माहेश्वरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक्स आणि फेसबुकसह सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि लोक त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत आहेत. दूरदर्शननेही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

बातम्या वाचणारा आश्वासक आवाज काळाच्या पडद्याआड

सरला माहेश्वारी या दीर्घकाळ दूरदर्शनमध्ये काम करत होत्या. त्यांचा आवाज, त्यांचं व्यक्तिमत्व आणि बातम्या वाचण्याची त्यांची पद्धत सगळंच एक खास प्रकारची छाप पाडणारं होतं. त्यांनी आपल्या वृत्तवाचनातून वाचकांना बातम्या पाहण्याची गोडी लावली होती. बातम्या वाचणारा आश्वासक चेहरा अशी त्यांची ओळख होती. आज हा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

सरला माहेश्वरी यांच्या कुटुंबाने काय सांगितलं?

सरला माहेश्वरी यांच्या कुटुंबाने एक पोस्ट लिहून त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. तसंच त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार कऱण्यात येतील असंही सांगितलं. सरला माहेश्वरी यांची बातम्या वाचण्याची पद्धत अनोखी होती. त्यांचा आवाज लोकांना आवडत असे. तसंच त्या आश्वासक शैलीत बातम्या सांगत त्यांची ती शैलीही लोकांच्या पसंतीस उतरली होती.

दूरदर्शन कुटुंबातर्फे सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजी, दूरदर्शनच्या त्या सन्मानीय निवेदिका होत्या. त्यांचा सौम्य आवाज, स्पष्ट उच्चार आणि सादरीकरणाची पद्धत त्यांनी भारतीय वृत्त जगतात विशेष स्थान निर्माण केलं. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विश्वास निर्माण केला. अशी पोस्ट दूदर्शनने केली आहे.