इराणमध्ये सध्या हिजाबविरोधात महिलांकडून जोरदार प्रदर्शन करण्यात येत आहे. हिजाब घालण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ पत्रकार ख्रिश्चियन अमानपौर यांना हिजाब घालण्याचा आग्रह केल्याचे समोर आले आहे. इराणच्या अध्यक्षांच्या या आग्रहानंतर ही मुलाखत रद्द करण्यात आल्याचे अमानपौर यांनी सांगितले आहे. रिकाम्या खुर्चीसोबतचा फोटो अमानपौर यांनी ट्वीट केला आहे.

विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?

अमानपौर या ‘सीएनएन’ या वृत्त वाहिनीच्या मुख्य आंतरराष्ट्रीय निवेदिका आहेत. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इब्राहिम रईसी यांची मुलाखत नियोजित होती. या मुलाखतीसाठी केस झाकण्यास सांगण्यात आल्याचे अमानपौर म्हणाल्या आहेत.

‘मी याबाबत नम्रपणे नकार दिला. आम्ही न्यूयॉर्कमध्ये आहोत. या देशात हिजाबबाबत कुठलाही कायदा किंवा परंपरा नाही. याआधी इराणच्या बाहेर मुलाखत घेताना कुठल्याही इराणी अध्यक्षांनी अशाप्रकारची मागणी केली नाही’ असे ट्वीट या घटनेनंतर अमानपौर यांनी केले आहे. अमानपौर यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून त्यांचे वडिल इराणी नागरिक आहेत.

इराणमध्ये हिंसेचा उद्रेक ; तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर देशभर संताप; नऊ ठार

‘महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. महिलांकडून हिजाब जाळण्यात येत आहेत. या आंदोलनात आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दिली आहे. याबाबत इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांना मी प्रश्न विचारणार होते’, असे ट्वीट अमानपौर यांनी केले आहे.