देशाच्या नौदल प्रमुखांच्या नियुक्तीचे प्रकरण लष्करी न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. व्हाईस अॅडमिरल बिमल वर्मा यांनी व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या नौदल प्रमुख पदाच्या नियुक्ती विरोधात सोमवारी आर्म्ड फोर्सेज ट्रॅब्यूनलमध्ये याचिका दाखल केली आहे. करमबीर सिंह यांची नियुक्ती करताना ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केल्याचा बिमल वर्मा यांचा आरोप आहे.

व्हाईस अॅडमिरल वर्मा यांनी नौदल प्रमुखपदी आपली नियुक्ती न केल्याप्रकरणी केंद्र सरकारच्या निर्णयाला लष्करी लवादाला आव्हान दिले आहे. व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांची नुकतीच नौदलाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. अॅडमिरल सुनील लांबा यांची जागा ते घेतील. लांबा हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. व्हाईस अॅडमिरल सिंह हे सध्या विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत.

अॅडमिरल बिमल वर्मा हे अॅडमिरल सिंह यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. पण सरकारने सिंह यांच्यावर विश्वास दाखवला. यापूर्वी लष्कर प्रमुख जनरल बिपिन राव यांच्या नियुक्तीवेळीही केंद्र सरकारवर असाच आरोप करण्यात आला होता.

नूतन अॅडमिरल सिंह यांनी आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.