“देशातील प्रसारमाध्यमांनी केवळ नकारात्मकतेला प्रसिद्धी न देता सकारात्मक घडामोडी आणि देशाच्या यशाच्या कथांना प्राधान्य दिले पाहिजे. जर माध्यमांनी रचनात्मक पत्रकारिता केली नाही तर तरुण पिढी योग्य दिशा गमावून ‘झुरळाच्या’ (कॉक्रोच) मागे धावू लागेल,” असा इशारा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना दिला.
केरळमधील कोट्टायम येथे ‘दीपीका’ या प्रसिद्ध मल्याळम दैनिकाच्या १४० व्या वर्धापन दिन ,सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या उपरोधक संघटनेचा अप्रत्यक्ष उल्लेख करत माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सकारात्मक पत्रकारीतेची गरज
उपराष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. अशा काळात जबाबदार माध्यमांची भूमिका अधिक महत्वाची ठरते. “माध्यमांनी सकारात्मक उपक्रमांना योग्य स्थान दिले पाहिजे” जेणेकरून तरूणांना योग्य माहिती आणि आदर्श मिळतील,तसे न झाल्यास तरूण रस गमवतील आणि ‘झुरळांचे’ अनुकरण करू लागतील, ” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध नसल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की, क्षणिक प्रसिद्धी मिळवणाऱ्या गोष्टींना अवाजवी महत्त्व देण्याची माध्यमांची वृत्ती चुकीची आहे. “जर एखादी गोष्ट खरोखरच चांगली असेल, तर तिचे महत्त्व महिनाभरानंतरही टिकून राहते. पण अचानक काहीतरी समोर येते, सर्वत्र त्याचीच चर्चा होते आणि नंतर ते नाहीसे होते. हे फार काळ टिकू शकत नाही,” असा टोला त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ला लगावला.
काय आहे ही ‘कॉक्रोच जनता पार्टी’?
‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) हे सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेले एक उपरोधिक व्यासपीठ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यातून या मोहिमेची सुरुवात झाली.
पार्श्वभूमी: एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी बोगस पदव्या घेऊन वकिलीत येणाऱ्यांचा उल्लेख ‘झुरळे’ आणि ‘परजीवी’ असा केला होता. नंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, या वक्तव्याचा निषेध म्हणून राजकीय संवाद रणनीतीकार अभिजित दिपके यांनी उपरोधाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली.
सुरुवातीला केवळ एक व्यंग्यात्मक प्रयोग म्हणून सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मने अल्पावधीतच मोठे रूप घेतले. आज ही संघटना मीम्स आणि उपरोधिक राजकीय टीकेच्या माध्यमातून बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटी, आणि ढासळती शिक्षण व्यवस्था यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर तरुणांचा आवाज बनली आहे.
