ट्विटरकडून चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

ट्विटरने व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकली होती. मात्र, काही तासांतच पुन्हा ब्लू टिक देण्यात आली…

Twitter removes blue tick from Vice President Venkaiah Naidu
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक ट्विटरने काढून टाकली होती.

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून शनिवारी बराच गोंधळ उडाला. मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट असलेल्या ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचं सांगणार निळ्या रंगाचं चिन्हं) काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ब्लू टिक पुन्हा देण्यात आली.

खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्लू टिक अर्थात ब्लू व्हेरीफाईड बॅच दिला जातो. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही ब्लू टिक देण्यात आलेला आहे. मात्र, हा ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात आला असल्याचं शनिवारी निदर्शनास आलं. यावरून बरीच चर्चाही रंगली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानं सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली होती. यावरून ट्विटरवर टीकाही सुरू झाली. त्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर ट्विटरने पुन्हा ब्लू टिक दिली आहे.

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असं सांगितलं जात आहे.

venkaiah naidu twitter blue tick
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानं सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या कृतीबद्दल ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ट्विटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचं संघाचे राजीव तुली यांनी म्हटलंआहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vice president venkaiah naidu twitter handle blue tick twitter removes blue tick venkaiah naidu bmh