पंजाब काँग्रेसचे आमदार जोगिंदर पाल यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामावरून प्रश्न विचारणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या अडणचणींमध्ये आणखी भर घातली आहे. पाल हे पठाणकोट जिल्ह्यातील भोआमध्ये लोकांना संबोधित करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर पाल यांनी त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पठाणकोटच्या भोआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार जोगिंदर पाल यांनी पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता पंजाब काँग्रेससमोर आता नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एका बैठकीदरम्यान, एका व्यक्तीने जोगिंदर पाल सिंग यांना एक प्रश्न विचारला, तो ऐकून ते चिडले. त्यांनी सभेत त्या तरुणाला मारहाण केली. बैठकीत तैनात असलेल्या पोलिसांनीही तरुणांना बेदम मारहाण केली.

हा व्हिडिओ नवरात्रांच्या दरम्यान असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जोगिंदर पाल हे एका गावातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. एका व्यक्तीने त्यांना तुम्ही गावासाठी काय केले? असे विचारले. यावरुन आमदार पाल भडकले. त्यांनी त्या व्यक्तीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरक्षा रक्षकानेही त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेदरम्यान तेथे उभे असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. आमदारा पाल यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा हा लज्जास्पद व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमदार जोगिंदर पाल त्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.

यावेळी आमदार पाल यांच्यासह सहकाऱ्यांनी त्या तरुणाला अनेक वेळा मारहाण केली, जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दाबून ठेवले. एका पोलिसाने हस्तक्षेप करत त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही त्याला मारहाण करण्यात आली.

राज्याचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “आमदारांनी असे वागू नये. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि त्यांची सेवा करण्यासाठी येथे आहोत,” असे त्यांनी म्हटले.