रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. आज रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची दुसरी फेरी नियोजित आहे. रशियाचं युक्रेनवरील आक्रमण कायम असून रशियन सैन्य राजधानी किव्ह आणि इतर महत्वाच्या शहरांकडे आगेकूच करत आहे. या भीषण युद्धात युक्रेनचे सैन्य आणि युक्रेनमधील नागरिक देखील रशियाविरोधात उतरले आहेत. अनेक जण आपल्या देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत रशियन सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका युक्रेनियन नागरिकाचा रशियन सैन्याला रोखण्यासाठी प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनियन नागरिक रशियन टँकला रोखण्याच्या प्रयत्नात टँकवर चढताना दिसत आहे. त्यानंतर रशियन सैनिक एकत्र जमल्यानंतर तो युक्रेनियन त्या टँकसमोर बसतो आणि त्याच्याभोवती सैनिक जमल्याचं दिसंतय. हा व्हिडीओ उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह प्रदेशातील बाखमाच शहरातील असल्याचं समोर आलंय. "युक्रेनियन नागरिकांनी चेर्निहाइव्ह प्रदेशातील बाखमाच शहरातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन टँकची गती कमी केली. युक्रेनियन लोकांचे शौर्य अतुलनीय आहे," असं ट्वीट व्हिसेग्राड यांनी केलंय. असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक युक्रेनियन माणूस समोर उभा राहून रशियन लष्करी काफिलाची गती थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. दरम्यान, डच मीडिया आउटलेट बीएनओ न्यूजच्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील खेरसन शहराचा ताबा घेतला आहे. परंतु स्थानिक अधिकार्यांकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.