आई आणि मुलीने एका मोबाईलच्या दुकानात गोंधळ घालत तोडफोड आणि मारहाण केल्याचा प्रकार पश्चिम दिल्लीत घडला आहे. राजौरी गार्डन भागात २० फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण आता समोर आले आहे. यासोबतच दुकान मालकानेदेखील हा संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.

२० फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजता एक महिला तिच्या मुलीसह पश्चिम दिल्लीतील एका मोबाईल शोरुममध्ये आली होती. महिलेने शोरुममधील कर्मचाऱ्यांकडे नवीन मोबाईलची मागणी केली. या महिलेच्या लहान मुलीने नुकताच शोरुममधून मोबाईल खरेदी केला होता. हा फोन व्यवस्थित काम करत नसल्याची मुलीची तक्रार होती. मात्र शोरुममधील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिला आणि तिच्या मुलीने दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या दोघींनी शोरुममधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच एका पांढऱ्या टिशर्टमधील महिलेने शोरुममधील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

तीन महिलांनी शोरुममध्ये घुसून तोडफोड केल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक वेजचे मालक रिकी कोहली यांनी सांगितले आहे. ‘त्या महिला सॅमसंगच्या नव्या फोनची मागणी करत होत्या. त्यांनी ५ महिन्यांपूर्वी सॅमसंगचा फोन आणि त्या फोनचा विमा खरेदी केला होता. मात्र तो फोन व्यवस्थित काम करत नसल्याची त्यांची तक्रार होती. आमच्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी आणि जनकपुरीमधील कंपनीच्या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना विमा कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले होते. आमच्या शोरुममध्ये फोन दुरुस्त केला जात नाही, असे आम्ही त्यांना अनेकदा सांगितले होते. मात्र त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी दुकानात गोंधळ घालत काचा फोडल्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली,’ असे कोहली यांनी म्हटले आहे.

महिलांवर हात उचलायचा नव्हता, म्हणून आम्ही शांत होतो, असे रिकी कोहली यांनी म्हटले आहे. ‘हे महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला हा प्रकार अपमानजनक वाटला. त्यादिवशी जो प्रकार घडला, त्यातून आम्ही अद्याप सावरु शकलेलो नाही,’ असेही कोहली यांनी म्हटले आहे.

मोबाईल शोरुममध्ये घुसून गोंधळ घालणाऱ्या महिलांवर मालमत्तेचे नुकसान करण्याचा, मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांमधील एक महिला एका रुग्णालयात काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.