व्हिएतनाममध्ये शनिवारी एक स्पीडबोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत २३ जणांची सुटका करण्यात आली होती. व्हिएतनामचं सर्वात मोठं बेट असलेल्या ‘फू क्वोक’ बेटाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती. हा अपघात झालेल्या बोटीमध्ये लाव्हा मोबाइल्स कंपनीचे अनेक कर्मचारी आणि वितरक होते, अशी माहिती समोर आली आहे.
व्हिएतनाममध्ये बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत आता मोठी अपडेट समोर आली आहे. स्पीडबोटच्या कॅप्टनला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेवेळी जलवाहतूक सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं होतं का? याची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या स्पीडबोटच्या कॅप्टनचं गुयेन होंग हाई (वय ५७) अशी ओळख पटली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ३२ भारतीय पर्यटक आणि चार व्हिएतनाममधील कर्मचारी असलेली ही स्पीडबोट शनिवारी दुपारी किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर उलटली होती. व्हिएतनाममधील सर्वात मोठं बेट असलेल्या ‘फू क्वोक’ जवळ ही दुर्घटना घडली. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
दरम्यान, भारतीय दूतावासांच्या माहितीनुसार, या बोट दुर्घटनेतून वाचलेल्या १६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि ते आता मायदेशी परतत आहेत. मात्र, या दुर्घटनेतून वाचलेल्यांपैकी एकाची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्याच्यावर व्हिएतनाममधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोट नेमकं कशी उलटली?
व्हीएन एक्सप्रेस इंटरनॅशनल आणि व्हिएतनाम न्यूजच्या वृत्तानुसार, होन मे रुट न्गोआय बेटापासून ४०० मीटर अंतरावर स्पीडबोट उलटली. यात ३२ भारतीय पर्यटक आणि चार व्हिएतनामी खलाशी होते. ‘फू क्वोक’ या विशेष आर्थिक क्षेत्रात हे बेट येतं. या अपघातानंतर एकूण २१ जणांना वाचवण्यात यश आलं, तर १५ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर दोन पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममधील घटनेनंतर एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. “व्हिएतनाममधील ‘फू क्वोक’जवळ घडलेली बोट अपघाताची दुःखद बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या कुटुंबियांप्रति माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.
