चीनच्या दक्षिणेकडील वादग्रस्त समुद्रात चीनचे प्राबल्य वाढत असल्यामुळे या तंटय़ावर शांततापूर्ण तोडगा निघावा म्हणून भारताने सक्रिय पाठिंबा द्यावा, अशी मागणी व्हिएतनामने केली आहे.
व्हिएतनामचे पंतप्रधान नेग्वेन टॅन डुंग हे सोमवारी भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी भारतास ही विनंती केली आहे. टॅन डुंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहेत. आपल्या हद्दीतून भारताची जहाजे पाठविण्यास आमची पूर्णपणे मान्यता असून, यापुढेही आम्ही त्यास मान्यता देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात भारतीय नौदलाची ‘आयएनएस ऐरावत’ ही नौका चीनच्या हद्दीतून व्हिएतनामच्या दिशेने जात असताना चिनी अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून अटकाव करून बाहेर पडण्यास सांगितले होते. त्या पाश्र्वभूमीवर व्हिएतनामने केलेल्या या स्पष्टीकरणास महत्त्व आले आहे. पूर्वेकडील समुद्रासंबंधी असलेल्या तंटय़ांचे निराकरण, स्थैर्य, नाविक सुरक्षा आदी मुद्दे या प्रांतातील देशांच्या सामायिक हिताचे विषय आहेत. त्यामुळे, जगातील तसेच या विभागातील एक मोठी सत्ता म्हणून या सर्व मुद्दय़ांवर भारत शांततापूर्ण तोडगा काढेल, अशी आम्हाला आशा वाटते, असे डुंग यांनी नमूद केले. चीनसह सर्वच देशांसमवेत शांततापूर्ण व सहकार्याचे संबंध राहावेत, असे व्हिएतनामला नेहमीच वाटत आले असून, त्याच भूमिकेतून मित्रत्वाच्या नात्याने भारतासह अन्य देशांची जहाजे आमच्या हद्दीतून जाऊ देण्यास आम्ही नेहमीच मान्यता दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.