Jharkhand Youth Death Vietnam: घरची हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी हजारो मैल दूर व्हिएतनाममध्ये योग प्रशिक्षक म्हणून गेलेल्या झारखंडमधील दोन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. विनय यादव (वय २३) आणि राजा कुमार (वय २४) अशी या दोघांची नावे आहेत. काम संपवून घरी परतत असताना २५ सप्टेंबर रोजी हा अपघात घडला. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी कुटुंबीयांची मोठी आर्थिक आणि प्रशासकीय ओढाताण सुरू आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जमशेदपूरचा रहिवासी असलेला विनय यादव तीन वर्षांपूर्वी व्हिएतनाममध्ये योग प्रशिक्षक म्हणून रुजू झाला होता. तर रांची येथील राजा कुमार २०२५ मध्ये तेथे गेला. दोघेही दा लात (Da Lat) शहरातील ‘आदी योग अकादमी’मध्ये एकत्र काम करत होते. २५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडत असताना हे दोघे कंपनीच्या स्कूटरवरून घरी परतत होते. ओल्या रस्त्यावरून स्कूटर घसरल्याने ती समोरून येणाऱ्या एका कारला जोरात धडकली. यात राजाचा जागीच मृत्यू झाला, तर विनयने दोन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजाने व्हिएतनामला जाण्यापूर्वी चार वर्षे योगासनांचे कठोर प्रशिक्षण घेतले होते. त्याचे वडील इलेक्ट्रिशियन असून राजा हाच घरातील मुख्य आर्थिक आधार होता. “घरात कोणीही पाहुणे आले की आई रडू लागते. मुलाचा मृतदेह तरी लवकरात लवकर घरी आणावा, एवढीच तिची मागणी आहे,” अशी माहिती राजाचा लहान भाऊ शुभम कुमारने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

दुसरीकडे, जमशेदपूरमधील विनयच्या घरात परिस्थिती अधिक गंभीर आहे. व्हिएतनाममध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून राहणारा विनयचा चुलत भाऊ अभिजित याने सांगितले की, “विनयच्या निधनाची बातमी घरातील पुरुषांनाच माहिती आहे. त्याची आई आणि इतर महिला सदस्यांना तो अजूनही रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. त्या त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. मुलगा जगात नाही हे त्यांना सांगण्याचे धैर्य कोणातच नाही.”

पार्थिव मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च

परदेशातून पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि खर्चिक ठरत आहे. राजाचे पार्थिव आणण्यासाठी सुमारे २० लाख रुपये, तर विनयच्या पार्थिवासाठी १० लाखांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक तेथील कागदपत्रांची पूर्तता आणि पैशांची जुळवाजुळव करत असून, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडेही मदतीची याचना केली जात आहे.

झारखंड राज्य स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्षाच्या प्रमुख शिखा लाक्रा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, राजाच्या कुटुंबीयांनी पार्थिव आणण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेपैकी सुमारे १४ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे. येत्या दोन दिवसांत त्याचे पार्थिव भारतात आणले जाण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रशासनाकडून या खर्चाच्या प्रतिपूर्तीचा विचार केला जाईल. मात्र, विनयच्या कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिएतनाममध्ये सध्या आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता आणि भारतीय योगाविषयीचे आकर्षण यामुळे अनेक भारतीय तरुण तिथे योग प्रशिक्षक म्हणून जात आहेत; मात्र या दुर्घटनेमुळे दोन तरुण योग शिक्षकांचे आयुष्य अकाली संपले आहे.