#VijayDiwas: हा पाहा हाच तो करार ज्यानंतर पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी टेकले होते गुडघे

भारतीय लष्कराने ट्विट केली पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरच्या करारनाम्याची प्रत

भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा आणि पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी

भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ साली झालेल्या युद्धाला ४८ वर्षे पूर्ण झाले. या युद्धात भारतीय सैन्याने अपरिमित शौर्य गाजवून पाकिस्तानला चारी मुंडय़ा चीत केले. भारताने युद्ध जिंकल्यानंतर बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशा यांनी नियोजनबद्ध युद्धनिती प्रत्यक्ष युद्धात राबवली आणि भारताने हे युद्ध जिंकले. आजच्याच दिवशी म्हणजेच १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सेनेच्या ९३ हजार सैनिकांनी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली. भारत युद्धात विजयी झाला. भारतीय सेना, नौसेना, वायुसेनेच्या इतिहासात भारत-पाक युद्धात हा आपला सर्वात मोठा लक्षणीय व निर्णायक विजय होता. या विजयाने, भारताने बांगलादेशच्या निर्मितीत आपला ठसा उमटवला. हा विजय फक्त भारतीय सेनादलांचाच नव्हे तर, संपूर्ण देशाचा विजय होता. म्हणून हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. याच विजय दिवसानिमित्त भारतीय लष्कराच्या ट्विटरुन पाकिस्तान या पराभवची आठवण करुन दिली आहे.

भारतीय लष्कराच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन काही विजय दिवसानिमित्त काही फोटो ट्विट करण्यात आले आहेत. “सहनशीलता, क्षमा, दया को तभी पूजता जग है। बल का दर्प चमकता उसके पीछे जब जगमग है।,” अशा कवितेच्या ओळी ट्विटमध्ये पोस्ट करण्यात आल्या आहेत. यामधून तुमच्याकडे शक्ती असूनही तुम्ही सहनशीलता, क्षमा, दया दाखवल्यास जग तुमची पूजा करते असा अर्थ यामधून निघतो. “भारतीय लष्कराच्या निश्चयाला आणि शौर्याला आम्ही नमन करतो. याच शौर्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना शरण येण्यास भाग पाडलं,” अशा शब्दांमध्ये या विजयामध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या सैनिकांचे कौतुक करण्यात आलं आहे.

या ट्विटबरोबर काही फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका येथे पाकिस्तान सेनेचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यात झालेल्या कराराची प्रत, भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करलेल्या ९३ हजार सैनिकांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्रांची पहाणी करताना भारतीय जवान या फोटोंमध्ये दिसत आहेत.

भारताने या युद्धात विजय मिळवल्यानंतर पाकिस्ताने पूर्व पाकिस्तानवरील म्हणजेच बांगलादेशवरील ताबा सोडला आणि २२ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशचे पहिले प्रांतिक सरकार ढाक्यात सत्तेत आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vijay diwas when lt gen niazi led 93 000 pakistani soldiers surrendered to indian army in 1971 scsg

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या