देशाच्या राष्ट्रगीतासोबतच आता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावरून नवीन राजकीय वादंग निर्माण झाले आहे. विजय जोसेफ यांच्या शपथविधी सोहळ्यात केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले; तर दुसरीकडे, खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीत या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. यामुळे “विजयाने भाजपापेक्षा एक पाऊल पुढे टाकले,” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकी घटना काय आहे?

यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्देश जारी केला होता. त्यानुसार, अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये बंकिमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम्’ या गीताच्या मूळ सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. १९५० मध्ये घटना समितीने स्वीकारलेल्या केवळ दोन कडव्यांच्या परंपरेला छेद देत केंद्राने हा निर्णय घेतला होता. तसेच, ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’ इतकाच दर्जा देण्याचा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.

विजय जोसेफ यांच्या शपथविधी सोहळ्यात नियमांचे पालन

तमिळनाडूतील विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. केंद्राच्या निर्देशानुसार, राष्ट्रगीताच्या आधी ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी पूर्ण गायली गेली. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर राष्ट्रगीत आणि शेवटी तमिळनाडूचे राज्यगीत ‘तमिळ थाई वाल्थू’ हे गीत गायली गेली. या शिस्तबद्ध नियोजनामुळे विजयाने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपालाच आरसा दाखवल्याचे बोलले जात आहे.

बंगालमध्ये भाजपाची कोंडी?

दुसरीकडे, कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात मात्र ‘वंदे मातरम्’ हे गीत गायलं गेलं नाही. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह स्वतः उपस्थित होते. असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केले आहे. केंद्रानेच नियम बनवून, स्वतःच्या उपस्थितीत त्याचे पालन न झाल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी या नियमाला विरोध करताना म्हटले होते की, “हा रवींद्रनाथ टागोरांचा अपमान आहे. “राष्ट्रगीतानंतर वंदे मातरम् गीत गाणे अयोग्य असल्याचे त्यांचे मत होते.

काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध

काँग्रेसने १९३७ च्या अधिवेशनाचा संदर्भ देत म्हटले की, सर्व धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन केवळ दोन कडवी गाण्याचा निर्णय टागोरांच्या सल्ल्याने घेण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटले, “जे आज स्वतःला राष्ट्रवादाचे रक्षक मानतात, त्यांनी कधीच ‘वंदे मातरम्’ गायले नव्हते, हे दुर्दैवी आहे.”

तर दुसरीकडे, भाजपाने काँग्रेसवर ‘धर्मांध अजेंडा’ राबवल्याचा आणि इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. मात्र, विजय यांच्या सोहळ्यातील अंमलबजावणीनंतर आता भाजपाला आपल्याच नियमांच्या अंमलबजावणीवरून बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे.