भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय माल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर ठरवले आहे. अनेक बँकांची फसवणूक करून विजय माल्या भारतातून फरार आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत.

लंडन हायकोर्टाने आज(सोमवार) विजय माल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे. याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसूलीशी संबंधित खटला देखील जिंकला आहे. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आथा विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. तसचे, विजय माल्याकडून हायकोर्टाच्या आदेशाविरोधात अपील करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही समोर आले आहे.

बँकांच्या कंसोर्टियमने लंडन हायकोर्टाकडे मागणी केली होती की माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करावं. भारतीय बँकांच्या या याचिकेवर झालेल्या व्हर्चुअल सुनावणीत लंडन हायकोर्टानेन बँकांच्या बाजूने निकाल देत, हायकोर्टाचे न्यायाधीश माइकल ब्रिग्स यांनी विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं जात असल्याचा निर्णय दिला.

एसबीआयच्या नेतृत्वातील कंसोर्टियममध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, जम्मू अॅण्ड़ काश्मीर बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, यूको बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनानशीयल अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. आदींचा समावेश आहे.

तर, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्याने प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने नाराजी जाहीर केली होती. विजय मल्ल्याने ट्वीट करत म्हटलं होतं की, “टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जोडली आहे तसंच अनेक वेळा मी १०० टक्के रक्कम परत करण्यासाठी ऑफर दिली आहे याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?”.