भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या काही कथित पत्रांनी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रांमध्ये यूपीए सरकारच्या काळातील पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मल्ल्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा उल्लेख आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या दाव्यानुसार मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांनी मल्ल्या यांना बँकांच्या समूहाकडून कर्ज मिळविण्यासाठी आणि तब्बल दोन महिन्यांसाठी किंगफिशर एअरलाईन्सला उधारीने इंधनपुरवठा केल्याच आरोप आहे. त्यामुळे आता काँग्रेस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मल्ल्या यांनी या मागणीसाठी मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांच्याशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्यांकडून चिदंबरम यांना २१ मार्च २०१३ आणि मनमोहन यांना ४ ऑक्टोबर २०११ रोजी पत्र लिहण्यात आले होते. या पत्रात मल्ल्या यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) प्रमुखांशी भेट घडवून आणावी, यासाठी चिदंबरम यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, चिदंबरम यांनी मल्ल्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.
ही पत्रे उघडकीस आल्यानंतर भाजपने मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांच्याविरूद्ध टीकेची झोड उठवली असून या दोघांनीही मल्ल्यांना पाठिशी घातल्याचे आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी काम केल्याचा आरोप केला. हा सगळा पत्रव्यवहार उघड झाल्यानंतर काहीवेळातच भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे पितळ उघडे पडल्याचा दावा केला. विजय मल्ल्या यांना २००४ मध्ये पहिल्यांदा कर्ज मंजुर करण्यात आले होते, त्यानंतर २००८ मध्येही त्यांना कर्ज देण्यात आले.