लंडन : ब्रिटनमधील न्यायालयाने भारतातून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना दिवाळखोर जाहीर केले आहे. त्यामुळे मल्ल्या यांच्या जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचा भारतीय स्टेट बँकेसह भारतातील अन्य बँकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या बँकांनी मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाईन्सला कोटय़वधींचे कर्ज दिले आहे. ही हवाई वाहतूक कंपनी बंद पडली असून तिला दिलेले हे कर्ज थकित आहे. येथील उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागातील दिवाळखोरी आणि कंपनीविषयक मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश मायकेल ब्रिग्ज यांनी मल्ल्या यांना दिवाळखोर जाहीर करण्याचा निर्णय सुनावला. ६५ वर्षीय मल्ल्या यांना तूर्त जामीन मंजूर केलेला आहे.