किंगफिशर एअरलाइन्सच्या 6000 कोटी रुपयांसह सगळं कर्ज फेडण्यास विजय माल्या यांची युनायटेड ब्रुवरीज ही कंपनी सक्षम असल्याची माहिती त्यांच्या वकिलानं कर्नाटक हायकोर्टाला दिली आहे. युबी ग्रुपची एकूण मालमत्ता व शेअर्सचे बाजारमूल्य यांची किंमत 12,400 कोटी रुपये असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. किंगफिशर एअरलाइन्सचं कॉर्पोरेट गॅरंटर युबी समूह असून कंपनीचा अध्यक्ष विजय माल्या देशातून पळून इंग्लंडला गेला आहे.

कंपनीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्यामुळे कोर्टाने कंपनीला कर्जफेडीचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते त्याचे पालन करता येत नसल्याची बाजू वकिलांनी मांडली आहे. कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिनेश महेश्वरी यांनी खटल्याच्या कामकाजाला 2 एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे.

सुनावणच्यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ साजन पोवय्या यांनी कोर्टात सांगितले की, जानेवारीमध्ये कंपनीच्या मालमत्तांचे एकूण मूल्य 13,400 कोटी रुपयांचे होते, मात्र बाजारातील चढउतारांमुळे आता ह मूल्य 12,400 कोटी रुपयांइतके घसरले आहे. सगळ्या कर्जांचा विचार केला तरी एकूण कर्ज 10 हजार कोटींपेक्षा जास्त नसल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

तर उदय होला या वकिलांनी सांगितले की सक्तवसुली संचालनालयानं सगळं काही जप्त केलं आहे. कर्नाटक हायकोर्टाकडे पडून असलेले 1280 कोटी रुपये गुंतवलेले असते तर 137 कोटी रुपयांचं व्याज मिळालं आहे. अर्थात, या सगळ्या युक्तिवादांवर कोर्टानं सांगितलं, की एकूण मालमत्तेचा दावा करताना शेअर्सच्या किमतीवर फार अवलंबून राहता येणार नाही कारण शेअर्सच्या किमतीत चढउतार होत असतात. पुढे सरकण्यासाठी काहीतरी ठोस प्रस्ताव येण्याची गरज कोर्टानं व्यक्त केली आणि सुनावणी स्थगित केली.