Tamil Nadu Assembly amid Udhayanidhi Stalin’s renewed Sanatana Dharma row : तीन वर्षांपूर्वी द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरून वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभर गदारोळ निर्माण झाला होता. आता पुन्हा तशाच प्रकारचे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी केले. सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे, या वाक्याचा त्यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोरच त्यांनी हे विधान केलं आहे. तमिळ भाषेतील त्यांच्या या भाषणाची क्लिप व्हायरल झाली असून यावर आता अनेकविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले स्टॅलिन?

“लोकांना विभक्त करणाऱ्या सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे”, असं स्टॅलिन म्हणाले. नव्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी हे विधआन केले आहे.

भाजपाची टीका

भाजपा प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी उदयनिधींच्या या वक्तव्यावर टीका करत याला ‘विषारी बडबड’ म्हटलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार केसवन म्हणाले, “अशा वारंवार चुका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तमिळनाडूच्या राज्य चिन्हावर मंदिराचा गोपुरम (शिखर) आहे. तमिळनाडूतील जनता त्यांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा असा घोर अपमान कधीही विसरणार नाही आणि माफही करणार नाही.”

केसवन यांनी उदयनिधी यांच्यावर टीका करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे राहुल गांधी आहेत, जे फुटीरतावादी द्वेषाचे राजकारण करत आहेत. राहुल गांधींनी पवित्र सेंगोलची थट्टा केली आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अपमान करून त्यावर बहिष्कार टाकला. ज्याप्रमाणे राहुल गांधींना गेल्या ३ लोकसभा निवडणुकीत नाकारण्यात आले आहे, त्याचप्रमाणे उदयनिधी स्टॅलिन यांनाही तमिळनाडूच्या जनतेने सत्तेतून बाहेर काढले असले तरी त्यांची विषारी बडबड सुरूच आहे.”

उदयनिधी स्टॅलिन याआधी काय म्हणाले होते?

उदयनिधी स्टॅलिन यांनी तीन वर्षांपूर्वीही असंच विधान केलं होतं. यामुळे भारतात मोठे राजकीय वादळ निर्माण झालं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की, सनातन धर्म सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात आहे आणि तो नष्ट केला पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं, “काही गोष्टींना केवळ विरोध करून चालत नाही, तर त्या नष्टच केल्या पाहिजेत. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाला केवळ विरोध करू शकत नाही, तर आपल्याला त्यांचे निर्मूलन करावे लागेल; त्याचप्रमाणे आपल्याला सनातनचे निर्मूलन करायचे आहे.” या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, तरीही उदयनिधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आपण केवळ जातीभेदाविरुद्ध बोललो असून हे विधान “पुन्हा पुन्हा” करत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. नुकत्याच झालेल्या एका घडामोडीत, मद्रास उच्च न्यायालयाने जानेवारीत म्हटले होते की उदयनिधी यांचे विधान ‘द्वेषपूर्ण भाषणा’च्या (hate speech) कक्षेत येते.

विधानसभेत उदयनिधी-विजय यांच्यातील संवाद

आज सकाळी तामिळनाडू विधानसभेत एक हलकाफुलका प्रसंग पाहायला मिळाला. उदयनिधी स्टॅलिन यांनी आठवण करून दिली की मुख्यमंत्री विजय, टीव्हीके (TVK) आमदार जेसीडी प्रभाकर आणि ते स्वतः एकाच महाविद्यालयात शिकले आहेत. “मी, मुख्यमंत्री विजय आणि विधानसभा अध्यक्ष प्रभाकर आम्ही सर्व एकाच महाविद्यालयात शिकलो आहोत. पण प्रशासनाच्या बाबतीत द्रमुक ही ‘सीनिअर बॅच’ आहे आणि आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत”, असं त्यांनी मिश्किलपणे म्हटले. त्यांच्या या विधानावर विजयही हसताना दिसले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उदयनिधी यांच्या द्रमुक पक्षाचा विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून मोठा पराभव झाला आहे. टीव्हीकेने आपल्या पहिल्याच निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या, तर द्रमुकला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले.