Vijay Tamil Nadu CM Swearing-in Ceremony Details: तमिळनाडूमधील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. टीव्हीकेचे विजय जोसेफ यांना १२० आमदारांचं पाठबळ मिळालं असून त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, उद्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चेन्नईतील नेहरू स्टेडिअम येथे ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या शपथविधीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही उपस्थित राहणार आहेत.

विजय जोसेफ यांना १२० आमदारांचं पाठबळ

तमिळनाडूमध्ये २३४ सदस्यीय विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११८ संख्याबळाची आवश्यकता आहे. टीव्हीकेला १०८ जागा मिळाल्या असून दोन जागांवरून स्वतः विजय जोसेफ निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी एक मतदारसंघ सोडला असून टीव्हीकेकडे सध्या १०७ सदस्य संख्या आहे. त्यामुळे त्यांना ११ आमदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. अखेर, विदुतलै चिरुतैगल कच्ची (VCK), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPI-M) आणि काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला असून १२० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं आहे.

५९ वर्षांनंतर विजय हे तमिळनाडूचे पहिले बिगर-द्रविडी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र, त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात किती मंत्र्यांचा समावेश केला जाईल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळवण्यासाठी गेल्या एका आठवड्यात विजय यांची राज्यपालांसोबतची ही चौथी भेट होती. यापूर्वीचे त्यांचे दोन प्रयत्न आमदारांच्या पाठिंब्याअभावी यशस्वी झाले नव्हते.
तमिळनाडूमध्ये आज शपथविधी होणार होता. मात्र, विजय जोसेफ यांच्याकडे सत्तास्थापनेकरता पुरेसे पाठबळ नसल्याने आजचा कार्यक्रम रद्द झाला. आज दिवसभर टीव्हीकेची पाठबळ मिळवण्याकरता धडपड सुरू होती. या घडामोडींनंतर टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.

किती आमदारांचं पाठबळ?

  • टीव्हीके १०७
  • काँग्रेस ५
  • सीपीआय – २
  • सीपीआय (एम) – २
  • व्हिसीके – २
  • आययुएमएल – २

दुसरीकडे, एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ (AMMK) ने टीव्हीकेवर टीका करत त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. या राजकीय घडामोडींमुळे तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा “रिसॉर्ट पॉलिटिक्स” सुरू झाले असून २०१६ मध्ये माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर असा प्रकार पाहायला मिळाला होता. टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे, तर टीव्हीकेच्या आमदारांना चेन्नईजवळील महाबलीपुरम येथील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्हीसीके उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा दिलेला नाही.