Vijay TVK’s landslide victory : तमिळ सुपरस्टार थलपती विजय यांच्या राजकारणातील प्रवेशाने केवळ राज्याची पारंपारिक सत्तासंरचनाच उलथून टाकली नाही, तर तमिळ कुटुंबांमधील अंतर्गत समीकरणेही बदलून टाकली आहेत. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष, ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK), सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असताना, विजय यांना निवडून आणण्याकरता राज्यातील किशोरवयीन आणि तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धक्कादायक म्हणजे याकरता त्यांनी अत्यंत टोकाचे प्रयत्न केल्याच्या अनेक कथा समोर आल्या आहेत.
तमिळ सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षासह राजकीय मैदानात मारलेली एन्ट्री विशेषतः तरुण पिढीमध्ये अभूतपूर्व उत्साहाची लाट घेऊन आली आहे. तमिळनाडूतील अनेक घरांमध्ये या उत्साहाने विचित्र आणि टोकाचे वळण घेतले होते. तिथे मुले आणि किशोरवयीन चाहत्यांनी आपल्या आवडत्या नायकाला मत देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना चक्क धमकावल्याचे वृत्त आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तर भातात विष कालवू
सोशल मीडिया आणि स्थानिक रिपोर्ट्समध्ये अशा ‘भावनिक ब्लॅकमेल’च्या कथांचा पूर आला आहे. एका धक्कादायक घटनेत, एका लहान मुलाने आपल्या पालकांना अशी धमकी दिली की, जर त्यांनी TVK ला मत देण्याचे वचन दिले नाही, तर तो “कुटुंबाच्या भातात विष कालवेल.” न्यूज १८ नुसार, हे प्रकार केवळ शाब्दिक धमक्यांपर्यंतच मर्यादित नव्हते. राज्याच्या ग्रामीण भागातून अशा बातम्या आल्या की, मुलांनी आपल्या राजकीय मागण्या मान्य न झाल्यास स्वतःच्या घरावर किंवा घरातील थोरामोठ्यांवर शेण फेकण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात येतोय. तर उपोषण करणे, शाळेत जाण्यास नकार देणे किंवा पालकांनी विजयला पाठिंबा देण्याच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करेपर्यंत स्वतःला खोलीत कोंडून घेणे यांचा समावेश होता, असेही प्रकार किशोरवयीन आणि तरुणांनी केले असल्याचे धक्कादायक दावे करण्यात येत आहेत.
४ मे रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने अभूतपूर्व कामगिरी केली. सत्ताधारी पक्षाला धुळ चारत विद्यमान मुख्यमंत्र्यांचाही पराभव केला. तर, खुद्द विजय यांनी पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून दणदणीत विजय मिळवला. TVK च्या या लाटेने पन्नास वर्षे जुनी ‘DMK-AIADMK’ ही द्विसत्ता पद्धती मोडीत काढली आहे.
