थलपती विजय आणि त्याचा पक्ष टीव्हीके यांनी तामिळनाडूच्या निवडणुकीत मोठा करीश्मा दाखवला आहे. या पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा गेलेला पक्ष आता तामिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान अभिनेता आणि नेता विजयच्या वडिलांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

थलपती विजयचे वडील काय म्हणाले?

थलपती विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर म्हणाले, “मागच्या ३० वर्षांपासून विजय समाजासाठी, तमिळ जनतेसाठी काहीतरी करु इच्छित होता. त्याच्या मनात ही गोष्ट होतीच. त्याने हळूहळू त्याचं स्वप्न साकार केलं आहे. आता माझा मुलगा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार आहे. तमिळ जनता विजयवर अभिनेता म्हणून जसं प्रेम करते तसंच एक नेता म्हणूनही करते याची मला कल्पना आहे. राज्यातील प्रत्येक महिला विजयला आपला मुलगा मानते. युवक त्याला भाऊ समजतात. ६० वर्षे आणि त्यावरील महिलांसाठी विजय त्यांना नातवासारखा आहे. याचं कारण विजयच आहे. विजयने हे नातं सगळ्यांशी तयार केलं आहे.”

विजयच्या आईने काय म्हटलं आहे?

टीव्हीकेचे प्रमुख विजय यांच्या आई शोभा चंद्रशेखर यांचाही आनंद गगनात मावत नाहीये. विजय मुख्यमंत्री होणार आहे याचा आनंद होतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच विजयची बहीण म्हाली, विजय हा एक प्रचंड उर्जा असलेला माणूस आहे. तामिळनाडूमध्ये बदल घडवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला विजयकडून अपेक्षा आहे. तसंच आम्हाला कुटुंब म्हणून विजयबाबत ही खात्रीआहे की त्याने जी आश्वासनं जनतेला दिली आहेत ती तो पूर्ण करेल. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान विजय म्हणाला होता की लोक माझ्यावर विश्वास ठेवतात.आज त्याच्या विजयाने त्यांचं हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे असंही तिने म्हटलं आहे.

२०२४ मध्ये विजयच्या पक्षाची स्थापना

२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाची स्थापना केल्यानंतर विजयने विलुप्पुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे २८ ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली होती.

विजयच्या पहिल्याच सभेला तीन लाख लोक जमले होते. पहिल्याच सभेत विजयने आपली राजकीय विचारधारा काय आहे? आपण कोणाविरोधात लढणार आहोत, हे स्पष्ट केले होते.

भाजपाप्रणित केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका करताना आपला पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा असेल, हे विजयने स्पष्ट केलं होतं.

विजयची आघाडी हा ठरतोय चर्चेचा विषय

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजयची जोरदार मुसंडी पाहण्यास मिळते आहे. सुरुवातीला जे कल हाती येत होते त्यात DMK, AIAMK आणि TVK यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली. त्यानंतर विजच्या टीव्हीके या पक्षाने आघाडी घेतली. ६४ जागांवर घेतलेली ही आघाडी विजय आणि त्याच्या पक्षाला पुढे घेऊन गेली यात शंका नाही. एक्झिट पोल्समध्ये विजयच्या टीव्हीके पक्षाला ९८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ज्याच दिशेने हे कल जात आहेत हे दिसून येत आहे.