Vijay Oath Swearing Ceremony : तमिळनाडू्च्या विधानसभा निवडणुकीत आपला करीश्मा दाखवणारे नेते जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला राहुल गांधींची प्रमुख उपस्थिती होती. शनिवारी संध्याकाळी विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना सोपवलं. यामुळे विजय यांना कुणाचा पाठिंबा मिळणार यावरुन जो काही पेच तमिळनाडूत रंगला होता तो संपला आहे. आज सकाळी १० वाजता विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नईतल्या पंडीत जवाहरलाल नेहरु मैदानावर पार पडला आहे. विजय यांना १३ मे पूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करुन घ्या असे निर्देश राज्यपाल आर्लेकर यांनी दिले आहेत. विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधी आवर्जून उपस्थित होते.. यासह सर्व घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-
Vijay Oath Swearing Ceremony Live Updates: "मी जोसेफ विजय शपथ घेतो की...", तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विजय विराजमान
मुख्यमंत्री होताच विजय यांनी घेतलेले तीन धडाकेबाज निर्णय कुठले?
तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तीन मोठे निर्णय घेतले आहेत. तसंच आपण पहिल्या दिवसापासून काम करणार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
विजय यांनी कुठले तीन निर्णय घेतले?
२०० युनिट मोफत वीज: तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अंमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’: राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाचीस्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
महिला सुरक्षेसाठी विशेष दल: राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल. मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन असंही विजय यांनी जाहीर केलं आहे.
अभिनेत्री त्रिशा यांनी घेतली मुख्यमंत्री विजय यांच्या आईची आणि बहिणीची भेट
तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. तर अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीने यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. निळ्या रंगाची साडी नेसून अत्यंत पारंपरिक पोशाखात त्रिशा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. कार्यक्रमस्थळी त्रिशा येताच सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. गेल्या काही काळापासून थलपती विजय यांच्यासोबत त्रिशाचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यातील तिच्या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. त्रिशाने यावेळी विजय यांची आई आणि बहिणीचीही गळाभेट घेतली.
Joseph Vijay CM Oath Ceremony : जोसेफ विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान! अनेक दशकांचे DMK-AIDMK चे वर्चस्व मोडीत, 'या' ९ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश
मी भ्रष्टाचाराला कधीही थारा देणार नाही - जोसेफ विजय
"मी तामिळनाडूच्या जनतेला वचन देतो की, तुमच्या पैशाचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही किंवा त्याचा चुकीचा वापर करणार नाही. मी राजकारणात संपत्ती मिळवण्यासाठी आलेलो नाही, हे तुम्हा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. मी स्वतः कधीही भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही चुकीच्या मार्गाने पैसे कमवू देणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे असेल. आपण सर्व मिळून एक शक्तिशाली आणि प्रगत तामिळनाडू घडवूया." असा विश्वास तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि 'टीव्हीके' (TVK) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी शपथविधी सोहळ्यात जनतेला दिला.
जोसेफ विजय यांच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू
जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून जी शपथ घेतली त्यावेळी त्यांचे आई वडील दोघंही भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा त्यांचा पक्ष हा तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष ठरला. १०८ जागा त्यांच्या टीव्हीके पक्षाने जिंकल्या. मात्र त्यांच्याकडे बहुमताची संख्या नव्हती. जी औपचारिकता शनिवारी पूर्ण झाली. ज्यानंतर आज जोसेफ विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत.
जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित
जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर विजय यांच्यानंतर आनंद यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. विजय यांच्यानंतर, टीव्हीकेचे आमदार थिरू एन. आनंद यांनी तामिळनाडूमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. ते विजय यांच्या जवळचे मानले जातात. त्यानंतर विजय यांचे निकटचे सहकारी आणि विल्लिवाक्कम मतदारसंघाचे आमदार अधव अर्जुन यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. ते बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी डीएमकेचे कार्तिक मोहन यांचा पराभव केला. टीव्हीकेचे महासचिव अरुण राज यांनी शपथ घेतली. ते तिरुचेंगोडे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असून, तो विजय यांच्या सरकारसाठी उपयुक्त ठरेल. सेंगोत्तैयन हे विजय यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले आहेत.
जोसेफ विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान
जोसेफ विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर कार्यरत राहून मी राज्याचा विकास करेन. जनतेचं कल्याण करेन या आशयाची शपथ विजय यांनी घेतली.
विजयला मराठी राज्यपाल देणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
अभिनेत्री तृषा कृष्णनही सोहळ्याला उपस्थिती
विजय जोसेफ हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री तृषा कृष्णनही दाक्षिणात्य साडी नेसून सोहळ्याला उपस्थित आहे.
विजय जोसेफ यांचा थोड्या वेळातच शपथविधी
विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चेन्नईतल्या जवाहरलाल नेहरु मैदानावर आवर्जून उपस्थित आहेत. तसंच इतरही दिग्गजाची या सोहळ्याला उपस्थिती आहे.
विजय जोसेफ यांच्यासह कुठले आमदार शपथ घेणार आहेत?
विजय जोसेफ हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर त्यांच्यासह एकूण नऊ आमदार शपथ घेणार आहेत.
१) सेंगीट्टीयान
२) अधव अर्जुन
३) एन आनंद
४) अर्जुन राज
५) राज मोहन
६) वेंकटरामन
७) टी. के. प्रभू
८) कीर्तना
९) सीटीआर निर्मल कुमार
विजय यांच्या शपथविधीसह आणखी नऊ मंत्र्यांना दिली जाणर मंत्रिपदाची शपथ
विजय यांच्यासह नऊ आमदारांचाही मंत्री म्हणून शपथविधी सोहळा जवाहरलाल नेहरु मैदानातच पार पडणार आहे. विजय यांच्या मंत्रिमंडळात आमदार कीर्तना या सर्वात तरुण मंत्री असणार आहेत. त्या अवघ्या २९ वर्षांच्या आहेत. कीर्तना या शिवकाशी या मतदारसंघातून निवडणून आल्या आहेत.
विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधींची उपस्थिती
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विजय यांच्या शपथविधीसाठी चेन्नई या ठिकाणी दाखल झाले आहेत. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. चेन्नईतल्या जवाहरलाल नेहरु मैदानावर हा शपथविधी सोहळा आज सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
चेन्नईतल्या जवाहरलाल नेहरु मैदानावर पार पडणार विजय यांचा शपथविधी सोहळा
चेन्नईतल्या जवाहरलाल नेहरु मैदानावर विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठीची सगळी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
विजय यांचा आज शपथविधी, चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विजय जोसेफ विराजमान होणार आहेत. आज सकाळी १० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवूनही अभूतपूर्व यश मिळवलेल्या टीव्हीके या पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राहुल गांधींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
