मुंबई : उद्योजक, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी संध्याकाळी मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांचे उद्योजक पुत्र गौतम सिंघानिया यांनी एक्सवर यासंबंधी माहिती दिली. गौतम सिंघानिया हे रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक आहेत. विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी तीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी दुपारी दीड वाजता त्यांचे पार्थिव एल. डी. रुपारेल मार्गावरील ‘हवेली’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.
विजयपत सिंघानिया यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना हवाई उड्डाणाची विशेष आवड होती. ‘हॉट एअर बलून’मधून सर्वाधिक उंचावर उड्डाण करण्याचा जागतिक विक्रम विजयपत सिंघानिया यांच्या नावावर आहे. २०००पर्यंत रेमंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी या पदाची सूत्रे आपल्या मुलाकडे सोपवली होती. काही वर्षांपूर्वी पितापुत्रामध्ये कायदेशीर लढाई झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सामोपचाराने आपापसातील वाद मिटवला होता.
विजयपत यांचा जन्म एका अग्रगण्य उद्योजक कुटुंबात झाला. त्यांनी रेमंडची सूत्रे हाती घेतल्यानंतर रेमंडच्या सूटचे कापड आणि पुरुषांसाठीचे कपडे लवकरच लोकप्रिय झाले आणि रेमंड कंपनी जागतिक पातळीवर ओळखली जाऊ लागली. विजयपत सिंघानिया यांनी दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून ख्याती मिळवली. उत्पादन, किरकोळ विक्री क्षेत्र आणि निर्यात यामध्ये त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि रेमंडला भारतातील सर्वात आदर प्राप्त केलेली वस्त्रोद्योग कंपनी म्हणून प्रस्थापित केले.
