सीजेपीचे माजी प्रवक्ते विजेता दहिया यांनी आपल्याला पॉडकास्ट रेकॉर्ड करण्याच्या बहाण्याने दिल्लीतील जाफराबाद परिसरात बोलावून काही जणांनी धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. हिंदू धर्म आणि हिंदू देवतांबाबत सोशल मीडियावर केलेल्या व्हिडिओंवरून आपल्याला जाब विचारण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला जबरदस्तीने रोखण्यात आल्याचे दहिया यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्तींनी आपल्याला “अनेक तुकडे करू” अशी धमकी दिली आणि जाफराबाद मेट्रो स्थानकापर्यंत पाठलाग केल्याचाही त्यांचा दावा आहे. याबाबत सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दहिया यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली. त्याच दिवशी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, चुकीच्या पद्धतीने अडवणे, बेकायदा रोखून ठेवणे आणि जीवाला धोका निर्माण करणाऱ्या धमक्यांबाबत कारवाईची मागणी केली आहे. स्वतःसह कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी पोलिसांकडे विनंती केल्याचे सांगितले.

५ ऑगस्टला व्हॉट्सॲपवरून संपर्क

दहिया यांनी सांगितले, “५ ऑगस्ट रोजी ‘रोहित’ नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. या व्यक्तीने आपण प्रिन्स गौर यांच्या टीममधील असल्याचे सांगत पॉडकास्टमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्याच्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर एका इन्स्टाग्राम अकाउंटचे नाव आणि फेसबुक लिंक आहे.”

पॉडकास्ट कोणत्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेलसाठी होणार आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्यांना ‘एमजे मुकेश जैन’ नावाचे इन्स्टाग्राम अकाउंट आणि ‘सल्लू निशा’ नावाचे यूट्यूब चॅनेल दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या व्हिडीओंमध्ये त्याच व्यक्तीचा चेहरा दिसत असल्याचेही दहिया यांनी सांगितले. पॉडकास्टसाठी वारंवार संपर्क केला जात असल्याने अखेर त्यांनी निमंत्रण स्वीकारले.

कॅबने जाफराबादला नेले

३१ ऑगस्ट रोजी दहिया यांना घरून घेऊन जाण्यासाठी कॅब पाठविण्यात आली. दुपारी सुमारे ३ वाजता कॅब त्यांच्या निवासस्थानी आली आणि त्यांना जाफराबादमधील डीडीए कॉलनी परिसरात नेण्यात आले. सुमारे ४ वाजता ते तेथे पोहोचले. दहिया यांच्या म्हणण्यानुसार, रोहित नावाने संपर्क करणारी व्यक्ती तेथे आली. तिने कॅबचालकाचे पैसे दिले आणि पॉडकास्टसाठी ‘सर’ येणार असल्याचे सांगत जवळच्या एका उद्यानात थांबण्यास सांगितले. दहिया यांनी असा आरोप केला आहे की, रोहित म्हणून त्यांच्याशी संपर्क करणारी व्यक्ती प्रिन्स गौरच होती आणि त्याने सुरुवातीला आपली खरी ओळख लपवली.

सोशल मीडिया पोस्टवरून वाद सुरू

दहिया यांनी आरोप केला की, पॉडकास्टसाठी त्यांना बोलावणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद घातला. दहिया यांच्या म्हणण्यानुसार, प्रिन्स गौरने आक्रमकपणे त्यांना हिंदू देवतांबाबत सोशल मीडियावर अपशब्द का वापरला, असा सवाल केला. त्यावर आपण कोणाचाही अपमान केलेला नसून धर्मात आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत बोलत असल्याचे उत्तर दिल्याचे दहिया यांनी सांगितले.

परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला हात पकडून आपल्याला पुन्हा जबरदस्ती बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याच वेळी, “आज तू आमच्या जाळ्यात सापडला आहेस, आमचे लोक लवकरच येत आहेत,” असे बोलणे आपल्याला ऐकवण्यात आल्याचे दहिया यांनी सांगितले.

ई-रिक्षा, ऑटोने सुटण्याचा प्रयत्न

३८ वर्षीय दहिया यांनी सांगितले की, काही वेळाने त्यांनी आपला हात सोडवून तेथून धाव घेतली. त्यांनी एका ई-रिक्षाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्कूटरवरून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे मदत मागितली. मात्र, त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि मदत करणाऱ्या व्यक्तीला गौरने तेथून निघून जाण्यास सांगण्यात आल्याचा दहिया यांचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची कॉलर पकडली आणि “तुझे अनेक तुकडे करू” अशी धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दहिया यांनी अखेर एका ऑटोरिक्षाला थांबवून जवळच्या मेट्रो स्थानकावर नेण्याची विनंती केली.

दहिया यांच्या दाव्यानुसार, संबंधित व्यक्तीही ऑटोमध्ये बसली. त्याने त्यांचा हात पकडून ऑटोचालकाला कुठे जायचे याबाबत निर्देश देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्कूटरवर असलेले आणखी तीन जण ऑटोचा पाठलाग करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रो स्थानकातही दिल्या गेल्या धमक्या

ऑटोचालकाने अखेर जाफराबाद मेट्रो स्थानकाजवळ वाहन थांबवले. तेथे गर्दीचा फायदा घेत दहिया यांनी पुन्हा स्वतःची सुटका करून स्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही धमक्या थांबल्या नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मेट्रो स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर अनेक संदेश आणि कथित व्हॉईस नोट्स मिळाल्या. या व्हॉईस नोट्स त्यांनी माध्यमांसमोरही सादर केल्याचे सांगितले. त्याशिवाय त्याच क्रमांकावरून दोन मिस्ड कॉल आल्याचे आणि कॉलर आयडीवर नाव प्रिन्स दिसत असल्याचेही दहिया यांनी म्हटले आहे.

पोलिसांकडे तक्रार; अद्याप एफआयआर नाही

या प्रकरणी दहिया यांनी बेगमपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी प्रिन्स गौर, मुकेश जैन आणि काही अज्ञात व्यक्तींची नावे नमूद केली आहेत. संबंधित व्यक्ती खरोखर प्रिन्स गौर, मुकेश जैन किंवा सल्लू निशा यांच्याबरोबर काम करत होत्या की कोणाची ओळख किंवा सोशल मीडिया प्रोफाईलचा गैरवापर करण्यात आला, याबाबतही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दहिया यांच्या म्हणण्यानुसार, तक्रार दाखल करूनही अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. बेगमपूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने तक्रार पुढील तपासासाठी जाफराबाद पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगितले. दहिया यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून, संबंधित व्यक्तींविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.