Vijeta Dahiya : नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत काही दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे तत्कालीन प्रवक्ते विजेता दहिया यांची कॉक्रोच जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली होती. या कारवाईमागचं कारण म्हणजे जंतरमंतरवर आंदोलन सुरू असताना विजेता दहिया यांचा बर्गर खात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यावरून अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे विजेता दहिया यांचं हे वर्तन योग्य नसल्याचं कारण सांगत कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी दहिया यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली होती. दरम्यान, आता विजेता दहिया हे पुन्हा एकदा कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अभिजीत दिपके यांनी स्वत: या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. विजेता दहिया यांना पुन्हा सीजेपीत घेण्याबाबत आम्ही विचार करू, असं सूचक भाष्य अभिजीत दिपके यांनी बीबीसी न्यूज हिंदीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केलं आहे. यावेळी अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आगामी भूमिकेबाबतही महत्वाचं भाष्य केलं आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

विजेता दहिया यांचं कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पुन्हा पुनरागमन होणार का? या प्रश्नावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “आम्ही त्याबाबत विचार करू. मात्र, त्या दिवशी जे घडलं होतं ते थोडं संवेदनहीन होतं. पण विजेता दहिया हा अतिशय चांगला व्यक्ती आहे. ज्या घटनेमुळे कॉक्रोच जनता पार्टीमधून त्यांना पदावरून हटवण्यात आलं ती घटना संवेदनहीन होती. ती वेळ चुकीची होती आणि तसं घडायला नको होतं”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

विजेता दहियाची हकालपट्टी का करण्यात आली होती?

नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने संसद चलो मार्च आयोजित करण्यात आला होता. या मार्चवेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. तसेच अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, याप्रकरणी देशभरातून तीव्र पडसाद समोर आले होते. या आंदोलनादरम्यान विजेता दहिया यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची कॉक्रोच जनता पार्टीने गंभीर दखल घेत विजेता दहिया यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली होती.

“विजेता दहिया यांच्या असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जचा आंदोलक आणि टीममधील लोक सामना करत होते, त्यावेळीचा विजेता दहिया यांचा बर्गर खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे त्याचं वर्तन अमान्य आहे. दहिया यांची कृती आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे”, असं कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हणत विजेता दहिया यांना पदावरुन हटवलं होतं.

विजेता दहिया कोण आहे?

कॉक्रोच जनता पार्टीने विजेता दहिया यांचं नाव प्रवक्ता म्हणून जाहीर केलं होतं. विजेता दहिया हे राजकीय प्रकरणांचा अभ्यासक असल्याचं सांगितलं जातं. विजेता दहिया हे कंटेट क्रिएटर, लेखक आहे. त्यांनी अनेक युट्यूबर्ससाठी रिसर्च केलेला आहे.