Vijeta Dahiya expelled CJP spokesperson: कॉक्रोच जनता पार्टीने विजेता दहियाची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु असताना दहियाचा एक व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओनंतर त्याची हकालपट्टी केल्याचे पार्टीने म्हटले आहे. विजेता दहियाचे वर्तन असंवेदनशील आणि अयोग्य असल्याचे पार्टीने म्हटले आहे. दहियाचा व्हिडीओ सोशल माडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
विजेता दहियाची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सोमवारी संसद चलो मार्च आयोजित करण्यात आले होते. या मार्चवेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तसेच, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, याप्रकरणी देशभरातून तीव्र पडसाद समोर येत आहेत. या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ता विजेता दहियाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची कॉक्रोच जनता पार्टीने गंभीर दखल घेत, विजेता दहियाची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.
दहियाच्या कृतीचा कॉक्रोच जनता पार्टीने केला निषेध
“विजेता दहियाच्या असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जचा आंदोलक आणि टीममधील लोक सामना करत होते, त्यावेळीचा दहियाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे त्याचे वर्तन अमान्य आहे. दहियाची कृती आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे”, असे कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. “दहियाला पार्टीच्या प्रवक्तेपदावरून हटवले असून, सर्व जबाबदारीतून मुक्त केले आहे”, असेही पार्टीने स्पष्ट केले आहे.
दहियाचा व्हिडीओ चर्चेत
आंदोलनस्थळाच्या जवळच असणाऱ्या एका मॉलच्या शेजारी विजेता बर्गर खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. काही लोक विजेताला प्रश्न विचारत त्याच्याशी चर्चा करताना दिसत आहे. “आम्ही तिकडे आंदोलन करतोय आणि तू इथं बर्गर खातोय?”, असे आंदोलक त्याला जाब विचारताना दिसत आहेत. दरम्यान, केव्हा आणि कधी हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. याची माहिती समोर आलेली नाही. दहियाने एका व्हिडीओच्या माध्यमातून तो सातत्याने आंदोलनात काम करत असून, दोन रात्री झोपलो नसल्याचा दावा केला आहे.
