CJP चं आंदोलन देशभरात चर्चेत आलं आहे. सोमवारी या आंदोलनादरम्यान जो लाठीचार्ज झाला त्यानंतर या आंदोलनाला पाठिंबा वाढला आहे. देशातल्या विरोधी पक्षांनी, सामाजिक संस्थांनी विविधी सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच दिवशी एक व्हिडीओ व्हायरल झाला तो व्हिडीओ होता विजेता दहियाचा. विजेता दहिया बर्गर खातानाचा हा व्हिडीओ होता. ज्यानंतर CJP ने प्रवक्ता विजेता दहियाला त्याच्या पदावरुन हटवण्यात आलं. याच विजेता दहियाने आता अभिजीत दिपकेवर आरोप केले आहेत.

विजेता दहियाबाबत पक्षाने कारवाई करताना काय म्हटलं?

“विजेता दहियाच्या असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जचा आंदोलक आणि टीममधील लोक सामना करत होते, त्यावेळीचा विजेता दहियाचा बर्गर खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे त्याचे वर्तन अमान्य आहे. दहियाची कृती आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे”, असे कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हणत कॉक्रोच जनता पार्टीने विजेता दहियाला पदावरुन हटवलं आहे.

विजेता दहियाने काय म्हटलं आहे?

मला CJP तून काढून टाकण्यात आलं. अनेकांनी विचारलं तुमच्या भावना काय आहेत? मी इतकंच सांगू इच्छितो की माझं मन दुखावलं आहे. मी जंतरमंतरच्या जवळ मी बर्गर खात असताना मनुवादी लोकांनी मला जाब विचारला. बर्गरवरुन सगळा राडा झाला. त्यानंतर मला अनेकांचे फोन आले. मी आंदोलनात पुन्हा जाण्यासाठी तयार होत होतो. त्यावेळी मला अभिजीत दिपकेचा फोन आला. मला अभिजित म्हणाला की तू घाबरु नकोस काही हरकत नाही अशा गोष्टी होतात. अचानक मला तो म्हणाला की तू आंदोलनात येऊ नकोस. मी विचारलं का नको येऊ? तर म्हणाला की अरे तुझा तो बर्गरवाला व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. मी त्याला सांगितलं ट्रोलर्स टीका करत आहेत ठीक आहे पण तू तर पाहतो आहेस ना मागच्या दोन रात्रींपासून मी तिथे होतो. पोलीस आले तर काय करायचं हे ठरवत होतो. आपल्या मार्चला उशीर झाला, तरीही मी थांबलो होतो. नंतर मी आणि इतर लोक मार्चमध्येही सहभागी झालो. एके ठिकाणी मी होतो तिथे डोळे झोंबायला लागले होते कारण पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तू तर हे सगळं पाहतोय ना? तर अभिजित म्हणाला हो. अभिजीत तू कचोरी खात असतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावेळी मी तुझी बाजू घेतली. ट्रकवर अभिजीत का चढला हे विचारल्यावर मी तुझी बाजू घेतली होती. पोलिसांनी अमानुषपणा केला आणि तुम्ही त्यासाठीही सीजेपीला जबाबदार ठरवणार का? मी अशा गोष्टी करत होतो की ज्याने आंदोलनाला फायदा होईल आणि अचानक एक दिवस तुम्हाला कळतं की तुमच्याच लोकांनी तुम्हाला बळीचा बकरा बनवलं. असं म्हणत विजेता दहियाने प्रतिक्रिया दिली आहे.