Vikas Divyakirti On Old Rajendra Nagar Accident : दिल्लीतल्या राजेंद्र नगरमध्ये RAU's आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेवर दृष्टी आयएएसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "काही लोकांना बळी देण्यासाठी एक बकरा हवा आहे, म्हणूनच ते मला लक्ष्य करत आहेत. असं केल्याने लोकांना एक दोषी सापडतो, त्यांना कोणाला तरी दोष देता येतो. त्याचबरोबर आमच्या स्पर्धकांना वाटतंय की ही आपल्यासाठी चांगली संधी आहे, आपण त्यांच्यावर टीका करू शकतो, सगळे हिशेब करू शकतो." विकास दिव्यकीर्ति (Vikas Divyakirti) म्हणाले, विद्यार्थ्यांची नाराजी योग्यच आहे. कदाचित त्यांना माझ्याकडून अधिक अपेक्षा होती. म्हणून त्यांचा माझ्यावर रोष आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा राग माझ्यावर काढला याबाबत मी कृतज्ञ आहे. तसेच मला शिवीगाळ केल्याने, माझं नाव वापरल्याने समाजमाध्यमांवर अधिक व्हूज मिळतात, त्यामुळेच मला लक्ष्य केलं जातंय. हे एक प्रकारचं व्हर्च्युअल मॉब लिन्चिंग आहे. दृष्टी आयएएसचे संचालक म्हणाले, "मला भावनिक गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाहीत. तीन मुलांचा मृत्यू झाला आहे, त्या तळघरात पाणी शिरल्यावर विद्यार्थ्यांची तेव्हा मानसिक स्थिती काय असेल याचा मी विचार करतोय. त्यांना त्यावेळी झालेल्या वेदना ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांचा माझ्यासह सर्व कोचिंग इनस्टिट्युट चालकांवरील राग रास्त आहे. याप्रकरणी उपराज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मी उपस्थित होते. आता मी विद्यार्थ्यांनाही भेटणार आहे." हे ही वाचा >> Vikas Divyakirti : कोण आहेत विकास दिव्यकीर्ती, त्यांच्या ‘दृष्टी IAS कोचिंग’वर कारवाई का झाली? आमचा हेतू वाईट नव्हता : विकास दिव्यकीर्ती उपराज्यपाल व दिल्ली सरकार याप्रकरणी गंभीर आहे. त्यांनी विद्यार्थी व कोचिग इन्स्टिट्युट्सची बाजू देखील ऐकून घेतली. उपराज्यपालांनी एक समिती गठीत केली आहे, ज्यामध्ये मी देखील आहे. यावर लवकरच उपाय शोधला जाईल, अशी मला अपेक्षा आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आमचा (कोचिंग इन्स्टिट्युट) हेतू वाईट नव्हता. दिल्लीत २,००० हून अधिक कोचिंग इन्स्टिट्युट्स आहेत. मात्र यापैकी एकाही इमारतीकडे फायर एनओसी नाही. दिल्लीमधील मुखर्जी नगरमध्ये दृष्टी आयएएस इन्स्टिट्युट आहे. (PC : Vikas Divyakirti-YT/ANI) कोण आहेत विकास दिव्यकीर्ती (Who is Vikas Divyakirti) विकास दिव्यकीर्ती हे यूपीएससीसह इतर स्पर्धा परिक्षांसाठी विध्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या दृष्टी आयएएस इन्स्टिट्युट संस्थेचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते समाजमाध्यमांवरील लोकप्रिय शिक्षकांपैकी एक आहेत. देशभरात त्यांचे हजारो फॉलोवर्स आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव प्रचलित आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 12th Fail या चित्रपटात विकास यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही स्पर्धा परीक्षेशी संबंधित होता.