उत्तर प्रदेशमधल्या आझमगड जिल्ह्यात एक अजब लग्न पाहायला मिळालं आहे. येथील एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. परंतु त्याचवेळी मुलीच्या घरच्यांनी तसेच गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि त्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं. येथील अतरौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मैनुद्दीन पूर गावात गुरुवारी ही घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेला तरुण हा बछुआ पार या गावातला रहिवासी आहे.
प्रेयसीला भेटायला आलेला तरुण पकडला गेल्यानंतर सुरुवातीला गावकरी या तरुणाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु नंतर दोन्ही कुटुंबांच्या आणि तरुण-तरुणीच्या सहमतीने सम्मो माता मंदिरात या दोघाचं शुक्रवारी लग्न लावून देण्यात आलं.
कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव बछुआ पार येथील रहिवासी असलेला तरुण राहुल राजभर आणि अतरौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव मैनुद्दीन पूरमधील रहिवासी असलेली तरुणी करिश्मा राजभर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. राहुल नेहमी करिश्माला भेटायला तिच्या गावी येत होता. गुरूवारी देखील तो तिला भेटायला आला होता. परंतु यावेळी त्याला गावातल्या लोकांनी पकडलं.
कुटुंब आणि तरुण-तरुणीच्या सहमतीने विवाह संपन्न
राहुलला गावकऱ्यांनी पकडल्यानंतर त्यांनी राहुलच्या पालकांना आणि नातेवाईकांना मैनुद्दीन पूर येथे बोलावलं. दोन्ही मुलांच्या पालकांच्या सहमतीने या प्रेमी युगुलाचा जवळच्याच सम्मो माता मंदिरात विवाह झाला. राहुल आणि करिश्माने आता त्यांच्या संसाराची सुरुवात केली आहे.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवलं, निर्जन स्थळी नेलं आणि ५० लाखांची मर्सिडीज पेटवली
तरुण आणि तरुणीचा आनंद गगनात मावेना
मैनुद्दीन पूर गावचे सरपंच राजकुमार यादव यांनी सांगितलं की, दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शवल्यानंतर तरुण आणि तरुणीचं लग्न लावून देण्यात आलं. दोघेही या लग्नाने खूश आहेत.