विनय कुमार सक्सेना बनणार दिल्लीचे नवे उप राज्यपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

(फोटो सौजन्य- एएनआयवरून साभार)

गेल्या आठवड्यात अनिल बैजल यांनी दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैजल यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोमवारी राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदन जारी करत विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे उप राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विनय कुमार सक्सेना हे सध्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत. सक्सेना यांचा जन्म २३ मार्च १९५८ साली झाला असून ते कानपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. सलग अकरा वर्षे व्हाईट सिमेंट केंद्रात वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर, १९९५ मध्ये गुजरातमधील प्रस्तावित बंदर प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची जनरल मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आली होती. पुढे त्यांनी ढोलेर बंदर प्रकल्पाचे सीईओ आणि संचालक म्हणून काम केलं आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये KVIC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, विनय सक्सेना यांनी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी ‘हनी मिशन’, ‘कुम्हार सशक्तिकरण योजना’, ‘लेदर कारागीरांचे सक्षमीकरण’, यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinai kumar saxena appointed as new lieutenant governor of delhi rmm

Next Story
भारताकडून श्रीलंकेला ४००० मेट्रिक टन पेट्रोलची मदत; सोबत अन्न, औषधांचाही पुरवठा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी