Vinesh Phogat Asian Games Trials emotional exit : विनेश फोगटचे २०२६ च्या आशियाई खेळांसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न शनिवारी संपुष्टात आले. राजधानी नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीत महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिला मीनाक्षी गोयलविरुद्ध ४-६ असा पराभव पत्करावा लागला. या अटीतटीच्या लढतीत विनेश आणि मीनाक्षी यांच्यात बहुतांश वेळ गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, मीनाक्षीने निर्णायक क्षणी आपला संयम राखला आणि महत्त्वाच्या वेळी आघाडी कायम ठेवत अंतिम फेरीत धडक मारली.
आशियाई खेळांचे तिकीट मिळवण्याच्या निर्धाराने पुनरागमन करणाऱ्या विनेशसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. असे असले तरी, मॅटवरून बाहेर पडताना या माजी जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडू विनेश फोगटने उपस्थितांना असा संदेश दिला की त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले.” मी पुन्हा येईन”, असे विनेशने आखाडा सोडण्यापूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांच्याकडे बोट दाखवत म्हटले. विनेशचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले, तरी मीनाक्षीने अंतिम फेरीत प्रवेश करून आशियाई खेळांमधील आपल्या स्थानाचा दावा मजबूत केला आहे.
विनेशचे स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन
तत्पूर्वी, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या दोन आव्हानात्मक लढतींमध्ये विजय मिळवत विनेशने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि स्पर्धात्मक कुस्तीत दिमाखादार पुनरागमन केले होते. पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक मोहिमेनंतर पहिल्यांदाच खेळताना विनेशने उप-उपांत्यपूर्व (प्री-क्वार्टर) फेरीत ज्योतीवर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला तिला ‘पॅसिव्हिटी’ची (निष्क्रियतेची) चेतावणी मिळाली, परंतु लवकरच तिने स्वतःला सावरले आणि सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मॅट १ वरील रिव्ह्यू मॉनिटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सामन्यात सुमारे १० मिनिटांचा खोळंबा झाला होता.
उपांत्यपूर्व फेरीतील थरार आणि वाद
निशुविरुद्धची उपांत्यपूर्व फेरीची लढत अत्यंत नाट्यमय ठरली. सामन्यात तीन मिनिटे शिल्लक असताना विनेश ०-५ अशी पिछाडीवर होती, परंतु त्यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन केले. विनेशच्या एका पिनिंगच्या (चितपट करण्याच्या) प्रयत्नादरम्यान, पंचांनी तिला डाव पुढे चालू ठेवू देण्याऐवजी चार गुण दिले. आपल्याला अधिक गुण मिळायला हवेत असे वाटल्याने विनेशने या निर्णयाला आव्हान (रिव्ह्यू) दिले आणि तो रिव्ह्यू ती जिंकली. त्यानंतर लगेचच तिने ‘आर्म थ्रो’ केला, ज्यासाठी तिला चारऐवजी केवळ दोनच गुण मिळाले. तिचे दुसरे आव्हान अपयशी ठरले, परंतु तोपर्यंत तिने गुणांमधील फरक कमी करत ६-५ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर हा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला. पंचांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी विनेशचे पती सोमवीर राठी थेट मैदानावरील ‘फील्ड-ऑफ-प्ले’ भागात आले. अधिकाऱ्यांनी वचन देऊनही फुटेज न दाखवल्याने तणाव आणखी वाढला. या वादाचे रूपांतर विनेशच्या छावणीतील सदस्य आणि डब्ल्यूपीआय (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांच्यातील शाब्दिक चकमकीत झाले.
या गदारोळातही विनेशने आपले मानसिक संतुलन राखले आणि निशुवर ७-६ अशी मात करत आशियाई खेळांच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, नंतर उपांत्य फेरीत मीनाक्षीने तिची ही घोडदौड रोखली. निशुविरुद्धची लढत सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची झाली होती. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या निशुने सुरुवातीलाच अप्रतिम चार गुणांची खेळी करत ५-० अशी आघाडी घेतली होती आणि ती विनेशला चितपट करण्याच्या जवळ पोहोचली होती. मात्र, रिव्ह्यू स्क्रीनमधील तांत्रिक बिघाड आणि आव्हानांमुळे खेळ वारंवार थांबल्याने विनेशला विश्रांतीसाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.
निशुने ‘हाफ-हेड लॉक’ डावाचा प्रभावी वापर करत सामन्यावर पकड ठेवली होती, परंतु विनेशने दुसऱ्या फेरीत जोरदार चार गुणांचा थ्रो करत सामन्याचे चित्र पलटवले. त्यानंतर आणखी दोन गुण मिळवून तिने ६-५ अशी आघाडी घेतली. यानंतर धावसंख्या ६-६ अशी बरोबरीत सुटली, परंतु नियमांनुसार (क्रायटेरिया) विनेशला विजयी घोषित करण्यात आले.निशुचे शेवटचे आव्हान अपयशी ठरले आणि विनेश विजयी झाली. या पराभवाने खचलेल्या निशुने पंच किंवा विनेश कोणाशीही हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि ती रडत मॅटवरच बसून राहिली.
वजनी गटावरून निवड चाचणीपूर्वी वाद
या निवड चाचण्या सुरू होण्यापूर्वीच विनेश आणि कुस्ती महासंघादरम्यान (WFI) एक नवा वाद समोर आला होता. शनिवारी सकाळी विनेशला सांगण्यात आले की, तिने पॅरिस ऑलिम्पिकसह तिच्या शेवटच्या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा ५० किलो गटात खेळल्या असल्याने तिला केवळ ५० किलो वजनी गटातच खेळण्याची परवानगी दिली जाईल. विनेशने याला तीव्र विरोध केला. तिने महासंघावर भेदभावाचा आरोप केला आणि ५३ किलो वजनी गटातच खेळण्यावर ती ठाम राहिली. हा वाद वाढल्यानंतर डब्ल्यूएफआय (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांनी मध्यस्थी केली आणि अखेर तिला ५३ किलो वजनी गटाच्या चाचणीत भाग घेण्याची परवानगी दिली.
