Vinesh Phogat Disqualified Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेशचं वजन १०० ग्रॅमने अधिक असल्यामुळे तिला ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं आहे. ऑलिम्पिकच्या नियमांनुसार विनेश आता रौप्य पदकासाठी देखील पात्र ठरणार नाही. दरम्यान, या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विनेशचे प्रशिक्षक महावीर सिंह यांच्यापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्र सरकारकडे ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय सिंह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हा विनेश फोगटचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. विनेश जगभरात मोठा इतिहास रचणार होती. तिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याचं सांगत तिला अपात्र घोषित करणं मोठा अन्याय आहे. संपूर्ण देश विनेशबरोबर उभा आहे. भारत सरकारने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. ऑलिम्पिक समितीने ऐकलं नाही तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा.”

विनेश तू भारताचा गौरव आहेस : नरेंद्र मोदी

दरम्यान, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुला अपात्र ठरवलं जाणं हे फार वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे खूप दुख: झालं आहे, मात्र मी ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला आहे. तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत.

हे ही वाचा >> Paris Olympics 2024: विनेश फोगट अतिरिक्त वजनामुळे ठरली अपात्र, कोणाला मिळणार कुठलं पदक?

भारताच्या ऑलिम्पिक समितीचं म्हणणं काय?

यापाठोपाठ भारतीय ऑलिम्पिक समितीनेही एक परिपत्रक जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की ‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्दैवी बातम आहे. भारतीय चमूने रात्री तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचं वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात इतर कोणतंही भाष्य करू इच्छित नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat disqualified aap mp sanjay singh demands india should boycott olympics asc
Show comments