बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. बिहारचे भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या यशामागे काय मेहनत घेतली होती ते सांगितलं. तसंच बिहारमध्ये नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर केला नव्हता याचंही उत्तर दिलं आहे.
विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?
जर प्रामाणिकपणे संवाद ठेवला तर आघाडी आणि युतीच्या राजकारणात विश्वास असतो. आम्ही सातत्याने नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाशी चर्चा सुरु ठेवली होती. तसंच चिराग पासवान, उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांशीही आम्ही बोलत होतो. जो संवाद होता तो संवाद लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि जागा वाटपाच्या वेळी कामाला आला. सगळ्यांच्या मधला संवाद होता. त्यासाठी आम्ही एनडीएचे संमेलनं घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्तम संवाद होता. कारण जेव्हा कार्यकर्ते जेव्हा नाराज होतात तेव्हा त्याचा फटका बसतो. पण आम्ही यावेळी एक बॉडिंग तयार केलं असं विनोद तावडे म्हणाले.
नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जाहीर का केला नाही?
नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर का केला नाही असं विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये दिला होता, ना मध्य प्रदेशात, ना महाराष्ट्रात ना बिहारमध्ये. विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि यांनी आजारी माणसाला मुख्यमंत्री केलं बघा असं म्हणायचं आणि अपप्रचार करायचा होता. विरोधकांचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही हे केलं होतं. तसंच अमित शाह यांनी ज्यांना सांगायचं त्यांना योग्य शब्दांत सांगितलं होतं. की बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जागाच नाही. त्यामुळे जागा नसताना आम्ही नाव घोषित करायची गरजच नव्हती असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
रफ्तार पकड चुका है बिहार या टॅगलाइनबाबत काय म्हणाले विनोद तावडे?
रफ्तार पकड चुका है बिहार या टॅगलाइनबाबत विचारलं असता विनोद तावडे म्हणाले बिहारला जातीपातीच्या वर काढायचं असेल तर विकास हाच मुद्दा आहे. विकास करु यापेक्षा विकास आम्ही सुरु केला आहे हे आम्हाला सांगायचं होतं. त्यामुळे रफ्तार पकड चुका है बिहार हे वाक्य आलं. मोबाइल चार्ज करुन द्यायला पैसे द्यावे लागायचे कारण बिहारमध्ये वीज नसायची. आता सगळी परिस्थिती जनतेने पाहिली आहे. असंही विनोद तावडे म्हणाले.
