भारतातील मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये असलेल्या मुस्लिमांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. तसेच त्यांना भाजपाच्या राजवटीत सुरक्षित वाटते. देशभरातील मुस्लिमांच्या संरक्षणासाठी भाजपा सरकार अधिक पावले उचलतील, असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी श्रीनगरमध्ये बोलताना म्हणाले. विनोद तावडे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काश्मीर युनिटच्या भाजपा नेत्यांची बैठक घेतली आणि गांदेरबलमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले.

ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील १२५ कोटी लोकांसाठी काम करत आहे आणि काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्य ते गुजरातपर्यंत सर्व राज्यांचा एकाच धर्तीवर विकास करून तेथील जनतेला विकास आणि समृद्धीच्या समान संधी मिळतील याची काळजी घेत आहे.”

दरम्यान, “भाजपाचे कार्यकर्ते कधीही विश्रांती घेत नाही आणि वर्षभर सर्वसामान्यांसाठी काम करतात. तसेच पीएम मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी ऐन दिवाळीत आणि पुराच्या वेळी खोऱ्याला भेट दिली,” असंही विनोद तावडे म्हणाले.

आधीच्या सरकारवर निशाणा साधत तावडे म्हणाले की, “काश्मीर एकेकाळी भ्रष्टाचार, अराजकता, बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि नोकऱ्यांमधील अनियमिततेसाठी ओळखले जात होते. परंतु आता ती वेळ दूर नाही जेव्हा काश्मीरमधील प्रत्येक घरात कमळ फुलेल आणि भाजप हा एकमेव पक्ष असेल ज्यावर लोक विश्वास ठेवतील.”