भाजपाने सोमवारीच त्यांची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपाने संघटनेत फेरबदल करत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढील वर्षी पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने विनोद तावडेंना प्रभारी करण्यात आलं आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो आहे. यासोबतच पक्षाने इतर राज्यांमध्येही प्रमुख नियुक्त्या केल्या असून, तरुण चुग यांच्याकडे गुजरातची तर सतीश पुनिया यांच्याकडे पंजाबची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सर्वात मोठ्या राज्याची जबाबदारी विनोद तावडेंकडे
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत फेरबदल केले आहेत. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देवब यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. भाजपाच्या एकूण पक्ष रचनेमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस हे पद महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे विनोद तावडेंकडे सोमवारीच महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी प्रभारीही करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे. भाजपासाठी महत्त्वाचं राज्य अशी उत्तर प्रदेशची ख्याती आहे. याच उत्तर प्रदेशची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. यामुळे विनोद तावडे यांचं पक्षातलं वजन वाढलं आहे यात कुठलीही शंका नाही.
विनोद तावडेंनी पार पाडल्या आहेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
विनोद तावडेंना २०२० मध्ये हरियाणाचे राज्य प्रभारी म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आलं, जिथे पक्ष संघटन बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२२ मध्ये बिहारची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर, राज्याचे राजकीय चित्र बदलण्यात एक प्रमुख रणनीतीकार ठरले. २०२३ मध्ये राजद-जदयू सरकार हटवून एनडीए आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने प्रभावी कामगिरी केली. हा चढता आलेख कायम राखत, २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, लोकसभा मतदारसंघांच्या दोन श्रेणींमध्ये स्टार प्रचारक दौऱ्याच्या रणनीतीचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती
विनोद तावडेंनी चंदीगड महापौरपद निवडणुकीचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले असून, शहरातील महापालिका निवडणुकीत सलग पाच वर्षे भाजपच्या सातत्यपूर्ण यशात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
