राज्यातील नॅशनल कॉन्फरन्सप्रणित सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत जम्मु आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये तब्बल ७१ टक्क्य़ांनी घट झाल्याचा दावा  मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.
जम्मू काश्मीर विधीमंडळाच्या सत्रात बोलताना ओमर म्हणाले की, सुरक्षा दलांनी केलेल्या चोख कामगिरीमुळे दहशतवादी घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. तसेच या लष्करी कारवाईदरम्यान मानवी अधिकारांच्या उल्लंघनाचे प्रकारही घटून शून्यावर आल्याचा दावा त्यांनी केला.
जम्मू काश्मीरच्या जनतेने दाखवलेल्या धैर्यामुळेच खोऱ्यात शांतता प्रस्थापित झाली असून राज्य सरकारनेही शांतता कायम रहावी यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे ओमर यांनी सांगितले.
दरम्यान, बनावट मच्छिल चकमकीची चौकशी तसेच पाथरीबल बनावट चकमकीची चौकशी थांबवण्याच्या लष्कराच्या कृतीबाबत ओमर यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच याप्रकरणी पंतप्रधानांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.