scorecardresearch

रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचार; झारखंडमध्ये एक ठार, १२ जखमी; मध्यप्रदेशमध्ये ७७ जणांना अटक

मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथेही मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलिस ठाणे अंमलदारासह पाच जण जखमी झाले.

भोपाळ, अहमदाबाद, रांची : देशात ठिकठिकाणी काल झालेल्या रामनवमी उत्सवास हिंसाचाराचे गालबोट लागले. झारखंडच्या लोहरदग्गा  येथे एक जण ठार तर १२ जण जखमी झाले. मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये संचारबंदी लागू केली असून, आतापर्यंत ७७ जणांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

रविवारी मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये रामनवमी उत्सवात  झालेल्या हिंसाचारात पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी गोळीबारात जखमी झाले असून, सहा पोलिसांसह २४ जण  या हिंसाचार आणि जाळपोळीत जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये नऊ जणांना हिंसाचार आणि दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. आणंद जिल्ह्यातील खंभात येथे रामनवमी मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. साबरकंठा जिल्ह्यातील हिंमतनगरमध्येही हिंसाचारप्रकरणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथेही मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलिस ठाणे अंमलदारासह पाच जण जखमी झाले. नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

झारखंडमधील लोहरदग्गा येथील हिऱ्ही गावाजवळ दोन समाजाच्या गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात एक जण ठार आणि १२ जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हा हिंसाचार उसळला. दहा दुचाकी आणि एक पिकअप व्हॅनही या परिसरात जाळण्यात आली. उपविभागीय अधिकारी अरिवदकुमार यांनी सांगितले, की या भागातील इंटरनेट सेवा खंडित केली असून, कलम १४४ नुसार संपूर्ण जिल्ह्यात मनाई हुकूम लागू केले आहेत.

 दंगलखोरांकडून नुकसानीची वसुली : चौहान

दंगलखोरांची ओळख पटली असून, त्यांना शिक्षा होईलच, असे सांगून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिग चौहान म्हणाले, की ही घटना दुर्दैवी असून, सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करण्यात येईल. खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून तातडीच्या वैद्यकीय कारणांचा अपवाद वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा दिली जाणार नसल्याचे सांगितले.

बांधकामांवर कारवाई

दरम्यान, मध्यप्रदेशात खरगोन जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतर्फे खरगोन शहरातील ५० अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या बांधकामांच्या आडून रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप होत आहे. 

दिग्विजय सिंग यांचा आरोप

ज्येष्ठ काँग्रेस नेते व खासदार दिग्विजय सिंग यांनी भाजप नेता कपिल मिश्रा यांचा या दंगलीमागे हात असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले, की रामनवमीच्या दिवशी हिंसाचारग्रस्त खरगोन जिल्ह्यात मिश्रा यांचा वावर होता. मिश्रा यांनी मात्र यामागे जिहादींचा हात असल्याचा प्रत्यारोप केला. दिग्विजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, की कपिल मिश्रा जेथे जेथे जातात, तेथे दंगली घडतात. याचा सखोल तपास करणार का? फेब्रुवारी २०२० नागरी सुधारणा कायद्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध मिश्रा यांनी दिल्लीत प्रक्षोभक भाषण केले होते. त्यानंतर ईशान्य दिल्लीत पेटलेल्या दंगलीत ५३ जणांना प्राण गमवावे लागले होते. खरगोन दंगल रोखण्यात पोलीस आणि जिल्हा प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप सिंग यांनी केला. याप्रकरणी काँग्रेस सत्यशोधन समिती नेमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डावे, अल्पसंख्याक नेत्यांवर  ‘विहिंप’चा ठपका

नवी दिल्ली : रामनवमी साजरी करणाऱ्या लोकांवर देशभरात झालेल्या हल्ल्यांसाठी अल्पसंख्याक समुदायाचे नेते आणि डावे पुरोगामी हे दोषी असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या लोकांनी त्यांच्या अनुयायांना हिंसाचाराच्या मार्गावर नेऊ नये, असा इशाराही संघटनेने दिला आहे.भगवान श्रीरामाच्या जन्मानिमित्त साजरा होणारा हा उत्सव रविवारी ठिकठिकाणी मिरवणुका काढून साजरा करण्यात आला. या दरम्यान मध्य प्रदेश, गुजरात व झारखंडसारख्या राज्यांमध्ये दगडफेक आणि दंगलीच्या घटना घडल्या, तर दिल्लीतील जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चकमकी झाल्या.

विश्व हिंदू परिषदेचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी एका व्हिडीओ संदेशात वरील घटनांत झालेल्या हिंसाचाराचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे केले. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत हे निश्चित करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.‘देशात या पवित्र मुहूर्तावर रामनवमीच्या उत्सवादरम्यान हल्ले करण्यात येणे ही दुर्दैवी बाब आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम मोठय़ा संख्येत आहेत, तेथे त्यांनी रामनवमी उत्सवात हल्ले घडवून आणले, लोकांना जखमी केले, इतकेच नव्हे तर जिवे मारण्याचाही प्रयत्न केला’, असा आरोप जैन यांनी केला.

‘हिंदू समाज अशा प्रकारचा हिंसाचार खपवून घेऊ शकत नाही हे सर्व ख्रिस्ती धर्मप्रसारक, जिहादी व डावे पुरोगामी यांनी समजून घ्यावे, असे आवाहन मी त्यांना करतो’, असेही जैन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violence during ram navami celebrations in parts of india zws